ॲपे रिक्षाची धडक ; एकजण जागीच ठार
कोठे बुद्रुक घारगाव रोडवरील घटना
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक घारगाव रोडवर ॲपेरिक्षा चालकाने एका जणास पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना शनिवार ता.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. संतोष मुरलीधर दुधवडे ( ३२ ) रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संतोष दुधवडे हे शेतातून घरी पायी जात असताना त्याच दरम्यान एमएच १२ जीटी ६३०१ ॲप रिक्षा वरील चालक रामभाऊ किसन शिर्के याने रिक्षा हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवून संतोष दुधवडे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना औषधोपचारासाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता औषधोपचारा पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी अशोक अंकुश मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी वरील रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहेत.
