आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांना यशवंत वेणू पुरस्कार प्रदान !

आ.डॉ. तांबे यांचा सातत्याने लोकसंपर्क व कामांचा पाठपुरावा कौतुकास्पद —  सुशीलकुमार शिंदे

थोरात- तांबे परिवाराने यशवंतरावांच्या विचाराचा वारसा जपला —  मधुकर भावे

पुणे येथे शानदार कार्यक्रमात यशवंत वेणू पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी —

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा सांभाळताना बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात सातत्याने ठेवलेला जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा हा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले असून थोरात व तांबे परिवाराने खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी केले आहे.

पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात यशवंत वेणू प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय यशवंत वेणू पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार उल्हास पवार, कवी रामदास फुटाणे, उद्धव कानडे, कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, सचिन इटकर, नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व दुर्गाताई तांबे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यशवंत वेणू या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सध्या देशात अस्थिर परिस्थिती आहे. मात्र या सर्वांमध्ये काँग्रेसचा शाश्वत विचार देशाला तारणारा आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात सहकारातून मोठे काम उभे केले आहे. हाच आदर्श घेवुन आमदार डॉ. तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात ५४ तालुक्यात ठेवलेला जनतेशी सातत्याने संपर्क, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा, सभागृहात पदवीधर, बेरोजगार, शिक्षक यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी.याचबरोबर त्यांचा नम्र स्वभाव हा सर्वांना भावणारा आहे .

उच्च विद्याविभूषित असलेले डॉ. तांबे यांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारण्यांची सध्या राज्याला गरज आहे. एका वर्षात पाच लाख किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या नेतृत्वाने  सदैव प्रत्येकाशी अंतःकरण पूर्वक ठेवलेला संवाद हा संपूर्ण महाराष्ट्रातील इतर नेत्यांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले. तर दुर्गाताई तांबे यांनी संगमनेर शहराची स्वच्छता व शहर राबवलेल्या विविध उपक्रम मधून नवी ओळख निर्माण करून दिली आहे. यशवंतराव वेणू ताईंचा वारसा चालवणाऱ्या या दाम्पत्याने समाज उभारणीत जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून मोठे योगदान दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारे थोरात – तांबे परिवार आहेत. ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये सहकारातून आर्थिक समृद्धी निर्माण करताना नम्रता व शालीनता ही या परिवाराची संस्कृती राहिली आहे. आमदार डॉ. तांबे व दुर्गाताई तांबे यांनी जयहिंदच्या माध्यमातून केलेले सामाजिक काम, दंडकारण्य अभियानाची चळवळ ही राज्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरली आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आपल्याला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्रातील या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आपण राजकारण व समाजकारणात काम करत आहोत. या नावाने पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले तर दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, यशवंत वेणू नावाने पुरस्कार मिळतो आहे याचा मोठा आनंद आहे. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने संगमनेर आणि उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, कवि रामदास फुटाणे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. तर कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, सचिन ईटकर, यांनी आभार मानले. यावेळी संगमनेरसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RRAJA VARAT

One thought on “आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांना यशवंत वेणू पुरस्कार प्रदान !”
  1. छान महत्त्वपूर्ण बातमीपत्र नियमितपणे व्हाटसपवर आपण पाठवत आहात,धन्यवाद 💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!