महाशिवरात्रीला हरिश्चंद्रगडावर ‘सोलर ट्री’ दिव्यांचा लखलखाट!

प्रतिनिधी —

हरिश्चंद्रगडावर सौर दिव्याच्या माध्यमातून प्रकाश योजना करण्याच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. वन्यजीव विभागाने अथक प्रयत्न केल्यानंतर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासून हरिश्चंद्रगड सौर दिव्याच्या प्रकाशाने चमकत होता. कोव्हिड महामारिने खंड पडल्या नंतर यंदाच्या वर्षी भरलेली महाशिवरात्रीची यात्रा देखील गडावर मोठ्या उत्साहात पार पडली.

हरिश्चंद्र गडावरील मंदिर परिसर महाशिवरात्रीच्या अगोदरच्याच रात्री सौर दिव्यांच्या प्रकाशने उजळून निघाला आहे आहे. हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाच्या महत्प्रयासाने स्थानिकां बरोबरच हजारो भाविकांचे आणि पर्यटकांचे स्वप्न साकार झाले असल्याने उपस्थित वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि मुक्कामी असणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी जल्लोष केला.

समुद्र सपाटी पासून ४ हजार ६७० फूट उंचीचा असणारा हरिश्चंद्र गड. गौरवशाली इतिहासाचा आणि आध्यत्मिक, पौराणिक परंपरेचा वारसा लाभलेल्या आणि शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पतीने हरिश्चंद्र गडाला अभिजात निसर्गसौन्दर्याचे वरदानही लाभले आहे.

येथील कोकणकडा, प्राचीन हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, केदारेश्वराची गुहा, विविध भुरूपे, लहानमोठ्या गुहा आणि गडावरील समृद्ध जैवविविधता या मुळे गडावर गिरीरोहक, निसर्गप्रेमी, अभ्यासक यांचा नेहमी राबता असतो.

गिर्यारोहक आणि पर्यटकांची पंढरी म्हणून हा गड ओळखला जातो. गडावर मुक्काम करणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्याही मोठी असते. रात्रीच्या अंधारात येथे मोबाईलची बॅटरी किंवा पेटवलेली शेकोटी एव्हढाच उजेडाचा आधार असायचा.

गडावरील हरिश्चंन्द्रेश्वर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला गडावर मोठी यात्रा भरते. गडावर वीज न्यावी अशी भाविकांची तसेच पायथ्या लगतच्या गावातील लोकांची अनेक दिवसंपासूनची मागणी होती. नाशिक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल डी डी पडवळे, वनपाल शंकर लांडे आणि या विभागातील कर्मचाऱ्यांनी गडावर महाशिवरात्री पूर्वी वीज उपलब्ध करून द्यायची असा चंग बांधला होता आणि तो अखेर सत्यात आला.

गडावर मंदिर परिसरात एक, केदारेश्वर गुहेजवळ एक आणि गणेश गुहेजवळ एक असे तीन ‘सोलर ट्री’ बसवून विजेची सोय करण्यात आली आहे.

इंग्रजी वाय (Y) आकाराच्या युनिट मध्ये तीन,चार व साडेचार मीटर उंचीचे पिलर आहेत व त्या वर प्रत्येकी 395 वॅटचे चार पॅनल बसविण्यात आले असून या युनिट मध्ये दिड किलोवॅटच्या दोन बॅटरी बसविण्यात आल्या आहेत. या एका सौर झाडापासून सुमारे दीड हजार युनिट वीज उपलब्ध झाल्याने हा परिसर सौर दिव्यांनी उजळून निघाला आहे.

गडावर वीज उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिकांनी वन्यजीव विभागास आग्रह केला होता. गडावर भाविकांबरोबर पर्यटकही मुक्कामी असायचे. रात्रीच्या वेळी या सर्वांना अंधाराचा सामना करावा लागत असे. येथील विजेचा प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक नियोजनातून यासाठी निधी उपलब्ध केला. मोठ्या प्रयत्नाने या सर्व युनिटचे सुटे भाग गडावर पोहच झाले आणि सर्व युनिट महाशिवरात्रीच्या आगोदरच्या रात्री सुरू झाले. याचा आम्हा सर्व वन कर्मचाऱ्यांना आनंद झाला असून उभारण्यात आलेल्या या ‘सोलर ट्री’ युनिटचे ग्रामस्थ, भाविक आणि पर्यटकांनी संरक्षण करावे असे आवाहन वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल डी.डी. पडवळे, वनपाल शंकर लांडे यांनी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

RRAJA VARAT

One thought on “महाशिवरात्रीला हरिश्चंद्रगडावर ‘सोलर ट्री’ दिव्यांचा लखलखाट !”
  1. I want to visit the Harishchandra Gad. My age is 77 years running. Is it possible to climb on foot at this age?
    I have trecked upto 15000feet in Himalayan under the guidance of Mountaineering Institute of the state of Himachal Pradesh upto Gauri Kund and Mani Mahesh Glaciers with the the Pune based Zape trekking club.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!