अगस्ती आश्रमात महाशिवरात्र निमित्त दोन दिवस यात्रोत्सव !

प्रतिनिधी —
कोव्हिड महामारीच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर अगस्ती ऋषींच्या आश्रमात महाशिवरात्री निमित्त दोन दिवसांचा अगस्ती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे भाविकांनी कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून सहभागी व्हावे. या उत्सवानिमित्त दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. अशी माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड. के.डी. धुमाळ यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेत दोन वर्षे खंड पडला होता. मात्र या वर्षी यात्रा भरण्यात यावी अशी मागणी भाविक भक्तांकडून होत होती. दोन वर्षांच्या कालखंडा नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अगस्ती उत्सवाचा आनंद घेता यावा व गर्दीचे प्रमाण लक्षात घेता उत्सव दोन दिवस ठेवण्यात आलेला आहे. भाविक भक्तांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्रस्ट च्या वतीने अगस्ति उत्सवाची सर्व तयारी झालेली आहे.

महाशिवरात्री निमित्ताने मंगळवारी पहाटे ३ वाजता तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व त्यांच्या सुविद्य पत्नी, तसेच तालुक्याचे भूमिपुत्र तथा राज्याचे नगर विकास खात्याचे उपसचिव विजयराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष के.डी. धुमाळ, सर्व विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने मनोरंजनासाठी सर्व खेळणी, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी करोनाचे सर्व नियमाचे पालन करून या अगस्ती उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
