‘ज्ञानेश कुमार हटाव, SIR रद्द करा’ ; २ ऑक्टोबरला संगमनेरात धरणे आंदोलन
संगमनेर प्रतिनिधी –
विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकनाची (Special Intensive Revision – SIR) प्रक्रिया रद्द करावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवावे, या मागणीसाठी संगमनेर शहरात डावे पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, SIR प्रक्रियेमुळे देशभरातील मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील प्रारूप मतदार याद्यांमधून आतापर्यंत १३ कोटींपेक्षा अधिक नावे वगळली गेली आहेत. महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीतही पूर्वीच्या तुलनेत २१.१ टक्के मतदारांची घट नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, द इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकार रितिका चोप्रा यांच्या तपासणी अहवालात निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा समोर आला आहे. अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा आयोगाच्या काही निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवले होते. यामध्ये मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी तसेच SIRशी संबंधित निर्णयांचा समावेश होता.
या अहवालानंतर विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, ज्ञानेश कुमार यांच्या पदावरून हटविण्याची तसेच SIR प्रक्रिया स्थगित अथवा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोगाने मात्र सर्व निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर संगमनेरात २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवावीत आणि संविधानाचे संरक्षण व्हावे, या मागण्या मांडण्यात येणार आहेत.

या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन साथी निशा शिवूरकर, कॉ. ज्ञानदेव सहाणे, अझीझ भाई ओहरा, डॉ. दानिश, साथी राजाभाऊ अवसक, कॉ. प्रताप सहाणे, साथी शिवाजी गायकवाड, ॲड. किरण रोहम आणि संपत कोळेकर यांच्यासह आयोजकांनी केले आहे.
२ ऑक्टोबर रोजी संगमनेर प्रांत कार्यालयावर होणाऱ्या या आंदोलनातून SIR प्रक्रियेविरोधात तसेच मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी डावे पक्ष आणि संघटना आपली भूमिका मांडणार आहेत.
