गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड 

२६ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – चालक ताब्यात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणली. वाळुंज बायपास (ता. अहिल्यानगर) येथे सुमारे २६ लाख ७७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांना गोपनीय बातमीदारामार्फत आयशर टेम्पो क्रमांक एमएच-४३-बीजी-७२८० मधून गोवा राज्यातील विक्रीसाठीची दारू वाळुंज बायपासमार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून वाळुंज बायपास येथे सापळा रचण्यात आला.

२० ऑगस्ट रोजी पंचासमक्ष सापळा रचून थांबलेल्या पथकाला केडगावकडून वाळुंज बायपासच्या दिशेने येणारा संशयित टेम्पो आढळला. टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. वाहनचालकाकडे दारू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी नितीन रमेश तांबसकर (वय ३५, रा. तेंबवाडी, चराटे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या वाहनचालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शत्रुघ्न किरदक (रा. धाराशिव), प्रसाद सावंत (रा. खासकिलवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या फरार) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी टेम्पोमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे दारू भरून सोलापूरकडे नेत असल्याची माहिती समोर आली.

जप्त मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे :

– रॉयल स्टॅग सुपेरियर व्हिस्की – ८० बॉक्स (₹३,६४,८००)

– इंपेरियल ब्लू व्हिस्की – ९७ बॉक्स (₹३,९५,७६०)

– मॅकडॉवेल नं.१ व्हिस्की – ४९ बॉक्स (₹१,९९,९२०)

– रॉयल इन्फेक्ट ग्रेन व्हिस्की – ३९८ बॉक्स (₹६,६८,६४०)

– एड्रियल क्सासिक व्हिस्की – २० बॉक्स (₹२८,८००)

– आयशर टेम्पो (एमएच-४३-बीजी-७२८०) – ₹१०,००,०००

– एक मोबाईल – ₹२०,०००

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २६ लाख ७७ हजार ९२० रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूच्या प्रत्येक बॉक्सवर “FOR SALE IN GOA ONLY” असे नमूद असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

फिर्यादी पोकॉ/२५९२ प्रताप तान्हाजी देवकाते यांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ७१९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ६५(ई), ८०(१)(२), ८१, ८३, ९०, १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल नगर तालुका पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोउपनि. कृष्णकुमार सेदवाड तसेच अंमलदार संतोष खैरे, विजय ठोंबरे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भगवान थोरात, प्रशांत राठोड व सुनिल मालणकर यांनी केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!