घरासमोर गांजाची लागवड ; पोलिसांचा छापा
३ लाख २३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनगरवाडी, ता. जि. अहिल्यानगर येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून ३ लाख २३ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण ६४.७३ किलो ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मिळून आली आहेत.
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी पोलीस पथकासह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली. त्यावेळी एका घरासमोर अवैधरित्या गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या ठिकाणी राहत असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव अनिल लक्ष्मण बिरकर, (वय ४९ वर्षे, रा. धनगरवाडी, ता. जि. अहिल्यानगर) असे सांगितले. त्याच्या घरासमोर अवैधरित्या लावलेली गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली. या गांजाच्या झाडांचे एकूण वजन ६४.७३ किलो ग्रॅम असून त्याची किंमत ३ लाख २३ हजार ६५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये ३,२३,६५० रुपये किमतीचा ६४.७३ किलो ग्रॅम गांजा मिळून आल्याने आरोपी अनिल लक्ष्मण बिरकर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६५७/२०२६, एन.डी.पी.एस. कायदा कलम २०(अ), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल गजे, पोलीस उपनिरीक्षक अजय कोटे, सहाय्यक फौजदार सुदाम लोंढे, पोहेकॉ सुशांत दिडवे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख आणि अक्षय रोहोखले यांच्या पथकाने सहभाग घेतला.
