प्रा.किसन चव्हाण यांना कवी दिनकर साळवे पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी —

संगमनेर येथील नामवंत कवी दिनकर साळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुजात फौंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी लेखक व चळवळीचे कार्यकर्ते प्रा.किसन चव्हाण यांना घोषित करण्यात आला आहे.

पाच हजार रूपये रोख,सन्मानपत्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील साहित्य चळवळीत अत्यंत भरीव योगदान देणारे व विविध विषयाचे अभ्यासक राहिलेले साळवे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक, वंचिताच्या चळवळीत काम करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यावर्षी हा पुरस्कार राज्यातील कष्टकरी वर्गासाठी लढाई करणाऱ्या, वंचिताच्या वेदना संपुष्टात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, फर्डे वक्ते, चळवळीचे अभ्यासक, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, कृतीशील कार्यकर्ता म्हणून परीचित असणारे शेवगाव येथील प्रा.किसन चव्हाण यांना घोषित करण्यात आला आहे.

आंदोकोळ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या आजवरच्या सामाजिक चळवळीबददल त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.
पुरस्काराचे वितरण दिनकर साळवे स्मृतीदिनी ६ मार्च २०२२ रोजी संगमनेर येथे बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त संघराज रूपवते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे सद्स्य आमदर डॉ. सुधीर तांबे राहणार आहेत. या पुरस्काराचे संयोजन प्रा.के.जी भालेराव यांनी केले आहे.

पुरस्कार निवड समितीत प्रा.गंगाधर अहिरे, पत्रकार संदीप वाकचौरे, प्रा.डॉ.मिलिंद कसबे, प्रा.डॉ.राहूल हांडे यांचा समावेश होता. पुरस्कार प्राप्त झाल्याबददल चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
