मराठीला अभिजात दर्जा कधी ?

आज मराठी भाषा दिन. महाराष्ट्राची आपली बोली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारकडे भाषा समितीचा अहवाल पडून आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी आशा आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त संगमनेर महाविद्यालयातील मराठी या विषयाचे प्राध्यापक सुशांत सातपुते यांनी लिहिलेला हा लेख ‘संगमनेर टाइम्सच्या’वाचकांसाठी देत आहोत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने सर्वकष अहवाल तयार करून तो सरकारकडे सादर केला आहे. बरीच वर्षे उलटून गेली. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबितच आहे. आपली जडणघडण होते ती आपल्या भाषेतूनच. आपली भाषा आपली ओळख असते, संस्कृती असते, आपलं अस्तित्व असते.


यासाठीच दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आपण साजरा करत असतो. केंद्र सरकारने सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. या दर्जामुळे त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. त्यामुळे भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटते. भाषेच्या विकास कार्यास अधिक चालना मिळते.

मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत भाषेची प्राचीनता, मौलिकता आणि सलगता, भाषिक वांङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण, तिचे आधुनिक रूप आदी सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही याचे आश्चर्य वाटते. यासाठी लोकचळवळ उभी राहायला हवी. तरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल.

सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठी हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. आजच्या अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानवरही मराठी सत्तेची पताका फडकत होती. मराठी भाषा बोलणारे लोक जगातील सुमारे ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत. ते भारतातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे मराठी ही फक्त एका प्रांताची भाषा नसून ती महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे.

मराठी मध्ये दरवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात, शेकडो दिवाळी अंक निघतात, छोटी-मोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. मराठी ही फार श्रेष्ठ दर्जाची भाषा असून ती लिंगभाव, जात, वर्ग निर्मूलनाचे तत्त्वज्ञान कवेत घेऊन उभी आहे. स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणारे श्रेष्ठ लेखन या भाषेत झालेले आहे. तसेच धर्माच्या चिकित्सेवर, आंंतरजातीय विवाह, जातिनिर्मूलन यावरही या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात लिखाण झालेले आहे.

मराठी भाषा प्रागतिक विचारांना बळ देणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेने देशातच नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच मराठी भाषा गौरव दिनाच्या व कवी कुसुमाग्रज जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

RRAJA VARAT

One thought on “मराठीला अभिजात दर्जा कधी ?”
  1. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार बरोबर सगळे पत्रव्यवहार मराठी मध्ये करायला सुरुवात करावी. देशातील सर्व राज्य सरकार बरोबर फक्त मराठीतच केला तर केंद्र व इतर राज्य सरकारे वठणीवर येतील.
    इतर देशांबरोबरही फक्त मराठीतच करून आपलं वर्चस्व वाढवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!