कामगार नेते साथी सायन्ना एनगंदूल आणि साहित्यिक कचरू भालेराव यांना परिवर्तन पुरस्कार !

शांती फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी —
संगमनेर येथील शांती फौंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा परिवर्तन पुरस्कार नामवंत कामगार नेते साथी सायन्ना एनगंदूल व साहित्यासाठीचा ज्येष्ठ साहित्यिक कचरू भालेराव यांना घोषित करण्यात आला आहे. तर आढळा परिसरातील विडी कामगार चळवळीत योगदान देणारे चळवळीचे कार्यकर्ते सुखदेव दादा वर्पे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानपत्र ,सन्मान चिन्ह , शाल असे पुरस्काराचे स्वरूप असणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

संगमनेर येथील शांती फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्रातील कामगार, साहित्य, नाट्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. साथी सायन्ना एनगंदूल यांनी आपले समग्र जीवन कामगार चळवळी साठी समर्पित केले आहे. विडी कामगारांच्या लढ्यात त्यांनी भरीव योगदान देऊन त्यांच्या जीवनात पेन्शन प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

कचरू भालेराव यांनी दलित साहित्य भरीव योगदान दिले असून कथेच्या प्रांतात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.तमासगीर माणसे हे त्यांचे अलीकडचे पुस्तक विशेष गाजले आहे. संगमनेर येथील माध्यमिक विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

त्याच बरोबर नाट्य चळवळीसाठी विशेष योगदान देऊन संगमनेरची रंगभूमी समृद्ध करणाऱ्या राजन झांबरे, वंदना जोशी, प्रा. संगीता परदेशी, संध्या भाटे आणि नाट्यसंगीत शिवराम बिडवे यांना नाट्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. चिकणी येथील भारती बाबा माध्यमिक विद्यालय मुलींमध्ये दहावी प्रथम आलेल्या हर्षदा वर्पे हिला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ मुटकुळे यांचे वडील कै. काशिनाथ मुटकुळे व कै. चंद्रभागा मुटकुळे यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

पुरस्काराचे वितरण लवकरच संगमनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीत संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,पत्रकार संदीप वाकचौरे, माधवी देशमुख, सूर्यकांत शिंदे, सी.के. मुटकुळे यांचा समावेश होता. पुरस्कार प्राप्त झाल्याबददल पुरस्कार्थीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
