आलिशान कारमधून गुटखा तस्करी !

तिघांना अटक, चौघे फरार ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

28 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यात आलिशान कारमधून सुरू असलेली गुटखा वाहतूक उधळून लावली. या कारवाईत 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील चार आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, मुंढेकरवाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अमोल जाधव यांच्या घराजवळ सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोण्या दुसऱ्या कारमध्ये भरत असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपींची नावे अमोल रामदास जाधव (रा. मुंढेकरवाडी), अनिल रतन कुरुमकर (रा. मुंढेकरवाडी) आणि फरहान रेहमान बेपारी (रा. बुरुड गल्ली, श्रीगोंदा) अशी आहेत.

चौकशीत अमोल जाधव याने दीपक लोखंडे (फरार) याच्यासोबत भागीदारीत हा व्यवसाय चालवत असल्याची कबुली दिली. तसेच प्रतिबंधित गुटखा सांगली जिल्ह्यातील जत येथून ‘अप्पू’ व ‘माजीद’ (दोघेही फरार) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तर फरहान बेपारी याने शोयेब राजू तांबोळी (फरार) यांच्या सांगण्यावरून माल विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरएमडी, विमल पान मसाला, व्ही-१ सुगंधी तंबाखू असा सुमारे 6.03 लाखांचा गुटखा, दोन चारचाकी वाहने (अल्काझार व स्विफ्ट) किंमत 22 लाख, व 30,130 रोख रक्कम तसेच 55 हजार किमतीचे तीन मोबाईल असा एकूण 28.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!