नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा

अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल; विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

पुणे | प्रतिनिधी –

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने यापूर्वी आरोपीला दोषी ठरविले होते. शिक्षेवरील सुनावणीनंतर हा अंतिम निर्णय देण्यात आला. 

न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोर शिक्षा सुनावली. निकाल देताना तपास अधिकारी, सरकारी वकील, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि संपूर्ण तपास यंत्रणेच्या जलद व प्रभावी कामगिरीचे न्यायालयाने विशेष कौतुक केले. 

१ मे रोजी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर पुणे पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जलदगतीने सुनावणी पूर्ण होत सुमारे दोन महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला. राज्यातील जलदगतीने निकाली निघालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी हा एक महत्त्वाचा खटला मानला जात आहे. 

निकालानंतर पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आरोपीला प्रत्यक्ष फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतरच आपल्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!