वडगाव पान ॲसिड हल्ला: १०० दिवस उलटूनही पीडितेला न्याय नाही, हे दुर्दैवी! – डॉ. जयश्री थोरात

पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट ; न्यायाच्या लढाईत खंबीरपणे सोबत राहण्याचा दिला विश्वास

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याला १०० दिवस उलटून गेले, तरीही आरोपी मोकाट फिरत असून पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. नुकतीच त्यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली व तिच्या कुटुंबीयांना धीर दिला. “या न्यायाच्या लढाईत आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

पोलिसांचा संथ कारभार ; नागरिकांमध्ये संताप

१७ मार्च २०२६ रोजी वडगाव पान येथे एका चिमुकलीवर ॲसिड टाकून अमानुष हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉ. थोरात यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली होती. तसेच तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

मात्र, एवढा मोठा काळ लोटूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने, डॉ. थोरात यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत अहिल्यानगर येथे जाऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला होता.

लोकशाही मार्गाने संघर्षाची तयारी !

पीडितेच्या भेटीदरम्यान डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, “एवढे दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुक्यात आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. अशा नराधमांना कायद्याचा धाक बसण्यासाठी प्रशासनाने आरोपीला तात्काळ अटक करावी. या चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.”

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका नेहमीच एक ‘परिवार’ म्हणून जपला आहे. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे आत्मीयतेचे व जिव्हाळ्याचे नाते आहे. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच परंपरा पुढे नेत डॉ. जयश्री थोरात या कुटुंबाच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

या भेटीप्रसंगी वडगाव पान परिसरातील युवक, महिला कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनीच या घटनेचा तीव्र निषेध करत पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!