‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा ; दोषींना कठोर शिक्षा करा’

टीईटी – नीट पेपरफुटी प्रकरणी NSUI चे प्रशासनाला निवेदन

संगमनेर | प्रतिनिधी

देशभर गाजलेल्या नीट आणि राज्यभरातील टीईटी पेपरफुटी प्रकरणावर आता संगमनेरमध्येही संताप व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, या मागणीसाठी युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष शेखर सोसे यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआयच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नीट आणि टीईटीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेतात. अभ्यास, प्रवास, राहण्याचा खर्च, फॉर्म फी आणि मानसिक तणाव सहन करूनही पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.

पेपरफुटीच्या माध्यमातून दलाल आणि गैरप्रकार करणारे कोट्यवधींची कमाई करत आहेत. शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराचे कुरण बनत असल्याची गंभीर टीका एनएसयूआयने केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निःपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी पूर्णपणे पारदर्शक परीक्षा प्रणाली राबवावी आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर सोसे, आदित्य बर्गे, गौरव गुंजाळ, ओमकार शेटे, सुदर्शन शिंदे, सार्थक गुंजाळ, प्रितम साबळे, सुदर्शन सानप, दीपक शिंदे, आलोक बर्डे, भूषण वाकचौरे, सार्थक सातपुते, हर्ष रणखांबे, सिद्धू बढे यांच्यासह एनएसयूआय व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!