शिवसैनिकांवर पोलिसांची नजर आणि पहारा ?
ही तर सरकारी दहशत आणि झुंडशाही — खासदार संजय राऊत
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रियेची शक्यता
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मतदार संघात येण्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर देखील वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

संगमनेर शिर्डी कोपरगाव राहाता आणि इतर भागातून शिर्डीतील विश्रामगृहावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक लावण्यात आली होती. यावेळी विश्रामगृहावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पहारा ठेवला होता. शिवसैनिकांना अक्षरशः नजरकैद केले असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत होते.
शिवसैनिक ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी पोलीस सतत त्यांच्या मागे, सोबत असत. गाडीत बसले तरी पोलीस त्यांच्या सोबत असत, असा प्रकार घडल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावर जोरदार आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. उघडपणे फिरण्याची हिंमत नाही तर गद्दारी केली कशाला असा टोमणा ही त्यांनी खासदार वाकचौरे यांना लगावला आहे.

शिवसैनिकांना अशाप्रकारे नजरकैदेत ठेवणे म्हणजे ही सरकारची झुंडशाही असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला असून शिवसैनिकांना पोलिसांच्या पहाऱ्यात आणि नजरकैदेत ठेवणे या संदर्भाने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत काय असा सवाल उपस्थित करीत खासदार संजय राऊत यांनी ही सरकारी दहशत असल्याचेही म्हटले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांना अशी अन्याय्य कारवाई थांबवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यानंतर ज्या ज्या वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरतील त्या त्यावेळी असा प्रसंग उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधीही त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर संगमनेर येथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. यावेळी देखील शिवसेनेकांमध्ये संताप असून आता संपूर्ण मतदारसंघात खासदार वाकचौरे यांना शिवसैनिकांच्या प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. आणि प्रत्येक वेळी पोलिसांनी जर शिवसेनेकांना नजर कैदेत आणि पहारा ठेवण्याचा प्रयत्न केला तर वाद आणखी चिघळू शकतो असेही पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसेनेतून बोलले जात आहे. संविधानिक मार्गाने प्रतिक्रिया देणे विरोध करणे हा आमचा हक्क आहे असेही कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे म्हणणे आहे.
