संगमनेर : ॲसिड हल्लेखोर अजूनही फरार !
डॉ.जयश्री थोरात यांनी घेतली होती पोलीस अधीक्षकांची भेट
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही संबंधित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या गंभीर प्रकरणात विशेष लक्ष घालून आरोपींना तातडीने अटक करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली हाती. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आता एक आठवडा झाला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत डॉ.जयश्री थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत तसेच संगमनेर तालुक्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती.
यावेळी त्यांनी वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेला दोन महिने उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

संगमनेर – अकोले उपविभागात महिला मुलींवरील अत्याचाराचा हा लेख वाढता आहे. काही महिन्यांपूर्वी अकोले तालुक्यातील राजुर पंचक्रोशीत सुमारे 55 अल्पवयीन विवाहित गर्भवती मुली आढळून आल्या होत्याm या खळबळजण प्रकारामुळे महिलांच्या मुलींच्या दमनाचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले. तसेच या दोन्ही तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. या संदर्भातले काही गुन्हे राजकीय दबावा खाली नोंदविले जात नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल. त्यामुळे या उपविभागातील मुली महिलांवरील अत्याचाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एलसीबीच्या हातीही काही नाही लागले…
जिल्ह्यातील गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कार्यरत आहे. मात्र एलसीबीच्या हाती अद्याप ऍसिड हल्ल्यातील आरोपींच्या संदर्भात कुठलीही आशादायक माहिती लागली नसून आरोपी पसारच आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, चोऱ्या, मोटरसायकल चोरी आदींवर कारवाई करण्यात आघाडीवर असलेल्या या पथकाला अद्याप आरोपी सापडले नाहीत. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनकडे हा गुन्हा असून तालुका पोलिसांच्या तपास पथकाने देखील यात काहीही प्रगती केली नसल्याचे चित्र आहे. अर्थात संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमधील गंभीर गुन्हे नेहमीच तपासावर असतात, त्यात प्रगती मात्र नसल्याचे दिसून येते.
