आमदार अमोल खताळ यांनी आपली ‘आमदारकी पणाला’ लावण्या आधीच रेल्वे रद्द झाली !
नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गे नेण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे उघड झाल्याचा आरोप
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नाशिक पुणे संगमनेर मार्गे सरळ मार्गाने जाणारा सेमी हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. आता ही रेल्वे दुसऱ्या नवीन मार्गाने जाणार आहे. त्यामुळे नाशिक ते पुणे या मार्गावर असणाऱ्या जनतेमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. असे असतानाच संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी ही रेल्वे संगमनेर मार्गेच नेण्यासाठी आपली ‘आमदारकी पणाला लावू’ असा केलेला दावा ‘सपशेल फोल’ ठरला असून रेल्वे सरळ मार्गे नेण्यास ते अपयशी ठरले आहेत असा आरोप आता त्यांच्यावर केला जात आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसल्याचे देखील जनतेमध्ये बोलले जात आहे.

नाशिक संगमनेर पुणे या सरळ मार्गाने जाणाऱ्या रेल्वेच्या प्रकल्पाची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प होण्याची वाट या परिसरातील जनता पहात होती. हा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचे देखील समोर आल्यानंतर या मार्गावरील सिन्नर संगमनेर अकोले खेड मंचर नारायणगाव ते थेट पुणे पर्यंत आंदोलने करण्यात आली. काही राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या. या सर्व प्रकारात लोकप्रतिनिधी, काही आमदार, खासदारही रेल्वे मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. काहींनी आपल्या भूमिका गुल्लस्त्यात ठेवल्या. त्याच काळात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी ही रेल्वे संगमनेर मार्गे नेण्यासाठी आपली आमदारकी पणाला लावू असा दावा केला होता. मात्र ही रेल्वे रद्द झाल्यानंतर त्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरला असल्याचे समोर आले आहे.

एवढेच नव्हे तर “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मला ओळखतात आणि या ओळखीचा फायदा घेऊन मी ही रेल्वे नियोजित सरळ मार्गे येण्यासाठी प्रयत्न करील” असेही ठोस आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र या ओळखीचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी सदर मार्ग रद्द केल्याचे आणि हा प्रकल्प आता नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे या मार्गे होणार असल्याचे सांगितले आहे. आता पुन्हा सर्व स्तरातून केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला जात असून नाराजीही व्यक्त केली जात आहे. आमदार खताळ आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वीच्या नियोजित नाशिक संगमनेर पुणे या सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेर अकोले तालुक्यातील कोणकोणत्या लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले हे जनतेसमोर आहे. तीन आमदार, एक पालकमंत्री, एक खासदार अशी राजसत्तेत असलेली मातब्बर मंडळी या दोन्ही तालुक्यात असताना ही रेल्वे पूर्वनियोजित सरळ मार्गाने गेली नाही. कोणी काय प्रयत्न केले हे हळूहळू जनतेसमोर उघड होईल. सध्या तरी हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेल्या असल्याचे चित्र आहे.
