अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापे यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही !
मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र देऊन दोन आठवडे झाले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत सुकेवाडी रोडला अनिकेत अशोक इथापे यांनी नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता आणि नगरपालिकेने नोटीस बजावूनही बेकायदेशीरपणे जी प्लस फोर असे एकूण पाच मजले इमारत बांधकाम केले असून सध्या हे बांधकाम सुरू आहे, या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचू शकते व इतर कलमांवर अनिकेत इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाची दोन पत्रे संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना दिली होती. मात्र दोन आठवड्याचा कालावधी होऊन गेला असला तरी अद्याप पर्यंत अनिकेत इथापे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती समजली आहे.

नगरपालिका प्रशासनाने संगमनेर शहर पोलिसांना पत्र दिले होते त्यात म्हटले होते की, अनिकेत अशोक इथापे यांनी स.नं. १५३/१/१ येथील ठिकाणी बांधकामास परवानगी घेतलेली नाही व कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम जागेवर करण्यात आलेले आहे. त्याबाबतचा तपशिल खालील नमूद प्रमाणे आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये विनापरवानगी बांधकाम स्थगित करण्याबाबत तसेच केलेले बांधकाम त्वरीत काढून घेणेबाबत नोटीस देण्यात आलेली होती. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत सदरचे सुरु असलेले बांधकाम स्थगित देखील केलेले नाही. तसेच केलेले बांधकाम काढून घेतलेले नाही.

दि.०५/०६/२०२६ रोजी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार पाहणी केली असता पाचव्या मजल्यावर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु होते. आयुब मणियार यांच्या इमारतीवर व अंगणात अनिकेत अशोक इथापे यांच्या बांधकामाचे ब्लॉक पडलेले दिसून आले व पश्चिम बाजूच्या रस्त्यावर देखील सिमेंट ब्लॉक पडलेले दिसून आले. जीवितास हानी उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तरी संबंधीतावर कायदेशिर गुन्हा दाखल करावा. तसेच या कामी रचना सहायक वैष्णवी गडाख व सहायक नगररचनाकार (प्रभारी) ओंकार सहाणे यांना मुख्याधिकारी यांचे वतीने प्राधिकृत करण्यात आले आहे.

संगमनेर शहराचा विकास आणि सुधारणा करण्याचा विडा नगराध्यक्षांनी उचलला आहे. शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध काम खपवून घेतले जाणार नाही. त्याची सुरुवात इथापें पासून सुरु झाली आहे. बस स्थानक ते बी एड कॉलेज पर्यंतच्या रोडवर असणारे भाजीपाला विक्रेते सुद्धा हटविण्यात आले आहेत. पुढचा नंबर बस स्थानक परिसर नवीन नगर रोड सह कारवाई सुरू राहणार आहे. आता शहरातील इतर भागात आणि उपनगरात कशी कारवाई होते, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या कोणकोणत्या बड्या मंडळींवर कारवाई होते, अतिक्रमण करणारे, पार्किंग नसणारे, बेकायदेशीर बांधकाम करणारे, हॉस्पिटल्सचे नियमबाह्य बांधकाम करणारे यांच्यावर कारवाई होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
