गोरक्षण संस्थेचा नंदी शाळा उपक्रम पथदर्शक ठरेल – शेखर मुंदडा
संगमनेर प्रतिनिधी —
‘देशी वाणाच्या गोवंशाच्या संवर्धनामुळे प्रचंड मोठी आरोग्य क्रांती घडू शकते. त्यामुळे देशी वाणाचे गोवंश प्राणपणाने जपले पाहिजेत. मालपाणी परिवाराच्या पुढाकारामुळे संगमनेर मध्ये गोरक्षण संस्थेतर्फे उभारण्यात आलेला राज्यातील पहिला वहिला नंदी शाळा उपक्रम त्या दृष्टीने नक्कीच पथदर्शक ठरेल. देशी गोवंश आधारित शेतीतून भविष्यात हमखास निरोगी पिढी घडेल’ असा विश्वास महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी येथे व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या आवारात मालपाणी परिवाराच्या सौजन्याने व ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सहयोगाने गोरक्षण संस्था संगमनेर द्वारा संचालन केल्या जाणाऱ्या ओम नंदी शाळेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटन पर भाषण करताना त्यांनी वरील आशावाद व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर गोरक्षण संस्थेचे विश्वस्थ ओंकार अट्टल, श्रीगोपाल पडताणी, मनोज पोफळे, श्रीमती ललिता मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंदडा म्हणाले की;’ महाराष्ट्रामध्ये आजमीतिला 1068 गोशाळा आहेत. मात्र नंदी शाळा एकही नव्हती. मालपाणी परिवाराच्या सहाय्याने गोरक्षण संस्थेने ही उणीव भरून काढली. काळाच्या ओघामध्ये पूर्वी कामधेनू म्हणून गौरविले गेलेली आमची देशी गाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. संकरित प्रजातीच्या होस्टन आणि जर्सी या गाई आमच्यावर लादल्या गेल्या आहेत. मात्र त्याचे दुष्परिणाम भयानक स्वरूपात पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने देशी गाईचे महत्व ओळखून तिची जोपासना करणाऱ्या गोशाळांना 140 कोटी रुपयांचे अनुदान देऊन मोठी चालना दिली आहे गोमय आणि गोमूत्र यातून तयार होणारे गोखत म्हणजेच रसायनमुक्त शेतीचा अर्थातच गोवंश आधारित प्राकृतिक शेतीचा मूलमंत्र आहे. त्यामुळे ‘ सेव्ह काऊ’ – गोवंश वाचवा’ असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या क्षेत्रातील प्रचंड अभ्यासू तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनानुसार मानव जातीतील सतोगेट मदर सारखे अद्ययावत शास्त्रीय प्रयोग देखील गोवंश जतन करण्यासाठी यशस्वी ठरले आहेत. शासनाच्या पशुपालक उद्योजक योजनेला भरघोस अनुदान असून त्यातून ग्रामीण भागातील अनेक युवकांच्या चरितार्थाची देखील सोय होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला शहराकडे धावण्याची गरज भासणार नाही’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी नंदी शाळा उभारण्यामागील आपली भूमिका सविस्तर विशद केली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन मकरंद रानडे यांनी केले. कार्यक्रमासाठी संगमनेर मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते.
