धांदरफळ खुर्द ग्रामसभेत बाजार समिती संचालकाकडून तरुणाला मारहाण ; गुन्हा दाखल
संगमनेर/ प्रतिनिधी
घरी पाणी येत नाही, याबाबत ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केल्याचा राग अनावर झाल्याने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी ‘तू असे काय प्रश्न विचारतो, तुझ्याकडे पाहून घेईन’ अशी धमकी देत प्रश्नकर्ते पियुष ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र होण्याची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे ग्रामसभा सुरू होती. या ग्रामसभेत गावातील पियुष ठोंबरे यांनी ‘आमच्या घरी पाणी का येत नाही’ असा जाब विचारला. याचा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांना राग आला त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या ठोंबरे या तरुणाला मारहाण केली. या प्रकारामुळे गावात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असून घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते मात्र ग्रामसभेस उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणा मध्ये आणली.

या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बाबत पियुष मारुती ठोंबरे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ग्रामसभा ही गावाच्या विकासा संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि नागरिकांच्या शंका निरसनासाठी असते. अशा ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर हात उचलणे ही गंभीर बाब असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात.
