प्रशासनाच्या दुर्लक्षावर तरुणांची कर्तृत्वाची चपराक !

 युवकांनी केला आश्वी खुर्द–आश्वी बु. प्रवरा पुल खड्डे मुक्त !!

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क आश्वी —

अनेक वर्षांपासून आश्वी खुर्द व आश्वी बु॥ गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील मुख्य पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे दुचाकी-चारचाकी अपघातांची मालिका सुरू होती. नागरिकांनी वारंवार सोशल मिडिया, प्रिंट मिडिया तसेच विविध शासकीय कार्यालयांकडे निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे कायमच दुर्लक्ष केले. प्रत्येक वेळी “हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग झाला आहे, सुमारे १६० कोटी रुपये मंजूर आहेत” अशी आश्वासनांची पळवाट काढत प्रत्यक्ष काम मात्र शून्यच राहिले.

शेवटी प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून आश्वी खुर्दच्या युवकांनीच पुढाकार घेत इतिहास घडवला. विकास गायकवाड, मोहीत गायकवाड, ज्ञानेश्वर पांडे, सागर रातडिया, मनोज कहार, गणेश घोयल दिपक बर्डे सुधिर सातपुते रमजान शेख संतोष बर्डे वैभव भंडारी देवीदास वाळेकर शैलेश सोनवणे बाळासाहेब शिंदे निलेश भवर तोफिक सय्यद आदी तरुणांनी आश्वी पोलिस ठाण्यातून बॅरिकेट आणून पुलावर वाहतूक नियंत्रणात घेतले. स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करत वाळू, खडी, सिमेंट सुमारे १५ गोणी साहित्य, पाण्याची व्यवस्था करून कामाला सुरुवात केली.

हे काम केवळ “रील किंवा सोशल मिडिया फोटोशूट”साठी नव्हते, तर पक्के काँक्रिटीकरण करत रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. एक बाजू पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व तरुण एकत्र आले आणि उरलेल्या बाजूचे खड्डेही बुजवले.

या कार्यामुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुखद धक्का बसला असून परिसरात या तरुणांच्या धाडसी आणि विधायक कामाचे जोरदार कौतुक होत आहे. दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज या जागरूक तरुण पिढीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात टळणार आहेत. प्रशासन झोपेत असताना तरुणांनी जबाबदारी स्वीकारली, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी आहे. तरुणांचे विधायक कार्य – प्रेरणादायी,bप्रशासनाची भूमिका – लाजिरवाणी अशा प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!