दत्तधाम चा भोंदू महाराज राजेंद्र गडगे साथीदारासह तुरुंगात !

भोंदू गडगेसह पाच जणांवर गुन्हा दाखल : एका साथीदारालाही अटक  

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील बहुचर्चित दत्तधाम चा भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यासह डॉक्टर मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे या पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेसह वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम आणि महाराष्ट्र नरबळी अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा अधिनियम व औषधी द्रव्य तिलस्मी उपचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

दरम्यान भोंदू राजेंद्र बापू गडगे यांच्यासह त्याचा साथीदार मधुकर शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसल्यास स्त्रियांना मूल देतो, घरात सर्व समस्या दैवी शक्ती द्वारे आणि मंत्र शक्ती द्वारे बरी करतो. असे लोकांना सांगून लोकांकडून हजारो रुपये वसूल करण्याचा उद्योग या भोंदू गडगेबाबाने केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोंदू बाबाच्या दत्तधाम सरकार युट्युब चॅनेल मध्ये असे अनेक उपचार केल्याचे व्हिडिओ चित्रीकरण आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पालापाचोळ्याचे औषधही दिले जाते. त्याचे मोठे बिल आकारण्यात येते. या औषधामुळे अनेक लोकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. हा भोंदू बाबा सुमारे दहा वर्षांपासून अडल्या-नडल्या लोकांचं आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण करीत आला आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी, फिर्यादी गवांदे यांच्या घरी गेले..

आरोपींपैकी ज्ञानेश्वरी गडगे हिने फिर्यादी ॲड. रंजना गवांदे यांना फोन करून मी तुमच्या घराच्या गेट समोर उभी आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे. चर्चा करायची आहे. असे सांगितले. त्यावेळी गव्हांदे यांनी चर्चेसाठी नकार दिला. त्यानंतर त्याच फोनवरून सोबत असलेला डॉक्टर मोहन पूरी याने सुद्धा भेट घेऊन चर्चा करायची आहे असे वारंवार फोनवरून सांगितले. मात्र त्यांना घरात न घेता मी हाकलून दिले. त्यावेळी एकूण तीन लोक माझ्या घराबाहेर थांबले होते. पोलिसांना फोन द्वारे संपर्क करून मी त्यांना सदर फोन नंबर पाठवले. त्यानंतर मला फोन व अन्य मार्गाने होणारा त्रास बंद झाला. मात्र सदर लोकांच्या अशा वर्तनामुळे मला असुरक्षित वाटत असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्या विरोधात खंडणी संदर्भातले खोटे व्हिडिओ व्हायरल करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न देखील दत्तधाम आश्रम आणि राजेंद्र बापू गडगे याने केला. त्यामुळे भोंदू बाबा राजेंद्र गडगे दत्तधाम आश्रम याने त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. दैवी शक्तीच्या आधारे मी कॅन्सर बरा करतो असे सांगून लोकांची फसवणूक केली आहे. तसेच त्यांचे आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण केले आहे. ही बाब जादूटोणाविराधी कायद्यानुसार गुन्हा आहे. गडगे हा आलेल्या रुग्णांना काही औषधही देतो. बाबा हा डॉक्टर नाही. त्याच्याकडे अन्न व औषध कायद्यानुसार औषध साठवण्याचा परवाना नाही. याबाबाने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट व मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टचाही भंग केला आहे. माझी व माझ्या संघटनेचे बदनामी खोटे व बनावट व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट व बी एन एस च्या कायद्यानुसार ही कारवाई व्हावी. गाडगेबाबा याने कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसताना आलेल्या लोकांना औषध उपचार केले म्हणून ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट व मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट नुसार कारवाई व्हावी. सुरज शिंदे, मधुकर शिंदे व डॉक्टर मोहन पुरी यांनी भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे यास व्हिडिओ तयार करण्यास मदत केली व त्यामध्ये सहभाग घेतला व सदर व्हिडिओ व्हायरल केले. माझे बनावट छायाचित्र बनवले व ते व्हायरल केले म्हणून आयटी ॲक्ट व भारतीय न्याय सहित अंतर्गत त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी गवांदे यांनी फिर्यादीमध्ये केली होती. 

त्यानुसार संगमनेर पोलिसांनी भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे यासह ज्ञानेश्वरी गडगे, डॉक्टर मोहन पुरी, सुरज शिंदे, मधुकर शिंदे ह्या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318, 319, 356, 352, 353, 336 (4) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम च्या कलम 3 प्रमाणे आणि औषधी द्रव्य तिलस्मी उपचार अधिनियमच्या कलम 7 प्रमाणे व वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम च्या कलम 33 व 36 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!