खासदार भाऊसाहेब वाकचौरे मारहाण प्रकरणात शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

संगमनेर | प्रतिनिधी —

२०१४ साली घडलेल्या एका गाजलेल्या प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर मोठा निर्णय देत संगमनेर न्यायालयाने शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

२०१४ मध्ये तत्कालीन शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार “गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवा” या भूमिकेतून संगमनेर येथे अमर कतारी, भाऊसाहेब हासे, अमोल कवडे आणि रमेश काळे यांनी वाकचौरे यांना जाब विचारत धक्काबुक्की मारहाण केल्याचा आरोप ठेवून चौघांना अटक करण्यात आली होती. 

या घटनेनंतर १४ ऑगस्ट २०१४ रोजी भारतीय दंड संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित शिवसैनिकांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत खासदार अनिल देसाई यांना संगमनेर येथे पाठवले होते. त्यानंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली.

पुढील काळात या प्रकरणाच्या वारंवार सुनावण्या होत राहिल्या. दरम्यान, आरोपींपैकी रमेश काळे हे शिंदे गटात दाखल झाले, तर अमोल कवडे यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला व सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून पत्नीला नगरसेवक केले. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिवसेनेत पुनर्प्रवेश झाल्यावर लगेचच अमर कतारी व भाऊसाहेब हासे यांना पक्षाच्या शहरप्रमुख व तालुकाप्रमुख पदावरून बाजूला करण्यात आले. या काळात अमर कतारी आणि भाऊसाहेब हासे यांना दोन वर्षे पदांपासून दूर राहावे लागले होते. मात्र, त्यांनी पक्ष आदेश मानत निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला व वाकचौरे यांना निवडून आणण्यात मदत केली व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेला उमेदवार शिर्डी लोकसभा मधून मोठा मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न देखील केले. 

२२ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून चारही आरोपींना निर्दोष मुक्तता दिली. या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई व जिल्हाप्रमुख सचिन कोते यांचे आभार व्यक्त केले. सध्या अमर कतारी हे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून भाऊसाहेब हासे हे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आरोपींच्या वतीने ॲड. सैफुद्दीन शेख यांनी सदरील केसचे काम पाहिले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!