छत्रपती शहाजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेमगिरी परिसराच्या पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे भेट देण्याची शक्यता
सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी —
नाशिक, शिर्डी, पुणे,भंडारदारा या महत्त्वाच्या धार्मिक व पर्यटन स्थळांच्या मध्ये असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष असलेल्या पेमगिरी गावाला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असून या परिसरातील शहागड विविध वनराई, डोंगरदरे, ऐतिहासिक व पौराणिक मंदिरे, बारव या सर्वांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने पायाभूत सुविधा निर्माण करत या परिसराला अधिकाधिक लोकप्रियता मिळवून पर्यटन वाढ व्हावी यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना साकडे घातले असून पर्यावरण मंत्री यांच्या सकारात्मते मुळे या गावच्या पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मार्गदर्शनाखाली पेमगिरी व परिसरात सातत्याने विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. पेमगिरी हे गाव बालाघाट डोंगर रांगेतील असून शहाजी महाराजांच्या गळ्यातील ताईत असलेल्या शहागडाचा परिसर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व देशातील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय वटवृक्ष येथे असून पौराणिक मंदिरे, बारव, निसर्गरम्य चारदरा, आवटदरा, गुरदरा, पाटीलदरा, सावरचोळ रस्ता, येळूशीदरा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच मोरदरा, पाझर तलाव, धबधबे यांसह निसर्गाच्या समृद्धतेने नटलेले अनेक भाग आहेत. त्यामुळे सनसेटसह येथील हिरवाई आणि डोंगरांचा परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत चांगला होऊ शकतो.

शिर्डी कडून भंडारदरा कडे जाताना मध्यावर असलेले पेमगिरी हे नाशिक-पुणे शिर्डी- भंडारदरा याचा सुवर्णमध्य आहे. पेमगिरीचा पर्यटनाच्या दृष्टीतून विकास झाल्यास या भागात पर्यटनास मोठा वाव मिळून येथे रोजगाराला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल यासाठी सत्यजीत तांबे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून यामध्ये एमटीडीसी च्या विभागाने माहिती केंद्र उभारत विविध सुविधा निर्माण कराव्या अशी मागणी केली आहे.

यात पेमगिरी मंदिराला “क”वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देणे, बुरूज, वाडा, बारव, गावातील वाडा याची दुरुस्ती करणे, वटवृक्ष परिसरात पायाभूत सुविधा, वीज, स्वच्छ पाणी ,पायवाट निर्माण करणे, सुखापुर चा डोंगर, कोथळ बाबा माळी डोंगर येथे बंजी जंपिंग, रोप रोप, जम्पिंग, मोरदरावडी येथे बोटिंग वॉटर गेम्स, हॉर्स रायडिंग, सायकल ट्रॅक असे विविध पर्यटनाच्या सुविधा निर्माण केल्यास या भागांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतील व त्याचा नक्कीच या परिसराच्या विकासात मोठा फायदा होईल.

याचबरोबर या परिसराला भेट देण्याची सत्यजित तांबे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली असून याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तसेच पर्यटन विभागाचे अवर सचिव यांना तातडीने कार्यवाईसाठी सांगितले आहे.
