नायलॉन मांजा विरोधात संगमनेरशहर भाजप आक्रमक !

संगमनेर | प्रतिनिधी —

गेल्या काही दिवसात नायलॉन मांजामुळे शहरात घडलेल्या तीन अपघातांच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक कारवाईचा इशारा दिला आहे. पादचारी आणि दुचाकी वाहक यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गळा कापल्या जाण्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या. नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची विक्री चालू आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज शहर पोलीस स्टेशन आणि नगरपालिका यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद केले आहे की, मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्याने शहरात पतंग आणि मांजा विक्री जोरात चालू आहे. दुर्दैवाने शहरातील काही दुकानदार बंदी घातलेला नायलॉन मांजा तसेच चिनी मांजा विकत आहे. या मांज्यामुळे पादचारी आणि दुचाकी वाहन चालक जखमी झाल्याच्या काही घटना शहरात घडल्या आहेत. गळ्याला हा मांजा घासल्यास प्राणघातक घटना घडू शकते. तरी संभाव्य दुर्घटना आणि जीवित हानी टाळण्यासाठी आपण शहरातील मांजा विक्रेत्या दुकानांवर योग्य ती कारवाई करून असला मांजा जप्त करावा आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी,अशी मागणी केली आहे. जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर कार्यकर्ते वेळ पडल्यास स्वतः कारवाई करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

युवा कार्यकर्ते कल्पेश पोगुल हे दोन दिवसापूर्वी आपल्या पुतण्याला घेऊन दुचाकी वर जात असताना मांजा येऊन त्यांच्या लहान पुतण्याच्या गळ्याला अटकला होता. सावधगिरीमुळे दुर्घटना टळली मात्र सावधानता म्हणून दुचाकी स्वरांनी लहान मुलांना गाडीवर पुढे बसवू नये, असे आवाहन त्यांनी केले. निवेदन देताना भाजपचे जिल्हा सचिव सीताराम भांगरे,ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, हर्षवर्धन खुळे,कल्पेश पोगुल, योगेश सूर्यवंशी, जगन्नाथ शिंदे उवस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!