पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मागणीसाठी माकपची गावोगाव स्वाक्षरी मोहीम
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे मूळ सर्वेनुसार, देवठाण बोटा स्टेशनसह व्हावी तसेच अकोले तालुक्याला मुंबईला जोडण्यासाठी शिर्डी अकोले घोटी रेल्वे सुरू करावी या प्रमुख दोन मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनजागृतीचा भाग म्हणून व्यापक स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये पक्षाचे काम असलेल्या 67 गावांमध्ये या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. अकोले येथील पक्ष कार्यालयामध्ये संबंधित गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच घेण्यात आले. रेल्वेची उपयुक्तता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून रेल्वे मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पक्षाच्या सर्व भातृभावी संघटना, किसान सभा, सी.टू. कामगार संघटना, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटना तसेच डी. वाय. एफ. आय युवक संघटना यासाठी गावोगाव पुढाकार घेत असून स्वाक्षरी मोहिमेसाठीचे छापील दस्तावेज या कार्यशाळेमध्ये सर्वांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोणतेही योग्य कारण न देता पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेचा पूर्वीचा मार्ग सुरुवातीला बदलून देवठाण व बोटा स्टेशन वगळण्यात आले. आता तर संपूर्ण रेल्वे मार्गच बदलून तो पुण्यावरून पुणतांबाला नेण्यात आला आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर येथील शेतकरी व श्रमिक जनतेवर हा मोठा अन्याय या माध्यमातून करण्यात आलेला आहे. या संपूर्ण परिसरातील अनेक युवक रोजगारासाठी व विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिक व पुणे शहरांमध्ये जाऊन राहत आहेत. रेल्वे मार्ग झाल्यास या सर्व विद्यार्थी व युवकांना शहरातील अत्यंत महागड्या व धकाधकीच्या जीवनापेक्षा गावाकडे राहून शहरातील रोजगाराचे माध्यम उपलब्ध होणार आहे. शेतीमालाला रास्त बाजारपेठ मिळण्यासाठी सुद्धा व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी सुद्धा या रेल्वे मार्गाचा मोठा उपयोग होणार आहे.

पूर्वीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गावरील तालुक्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते, विविध संघटना व कार्यकर्ते रेल्वेच्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलनात उतरले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे या सर्व तालुक्यातील कार्यकर्ते या आंदोलनासाठी सर्व पक्षीय आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. सोबतच आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये जात जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहेत.

रेल्वे कृती समितीच्या वतीने दिनांक 9 जानेवारी रोजी देवठाण येथे इशारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बोटा येथील युवकांनी पुढाकार घेत याच मागणीसाठी ग्रामस्थांच्या व पंचक्रोशीतील नेतृत्वाच्या पुढाकाराने रास्ता रोकोचे आयोजन केले आहे. या सर्व आंदोलनात्मक कृतीलाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला पाठिंबा व्यक्त करत आहे.

दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी नांदूर खंदरमाळ फाटा येथे नुकतीच सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी सर्व तालुक्यांमधील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतील असे ठरवण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भेटीसाठी वेळ द्यावी व लवकरात लवकर तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. असे प्रसिद्धी पत्र कॉ. सदाशिव साबळे, जिल्हा सचिव भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांनी प्रसिद्ध दिले आहे.
