देवठाण-बोटा थांब्यासह रेल्वे मार्गाबाबत 1 फेब्रुवारीच्या आत निर्णय करा !

अन्यथा एल्गार होईल : देवठाण परिषदेत इशार

अकोले | प्रतिनिधी

नासिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातून जावी या मागणीसाठी देवठाण येथे आज सर्वपक्षीय मागणी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे पत्र पाठवत या मेळाव्याची सुरुवात झाली. रेल्वे आमच्या हक्काची, आमच्या उज्वल भविष्याची या मागणीने यावेळी सबंध देवठाण पंचक्रोशी दुमदुमून गेली होती. देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या, किरण मामा रेल्वे द्या, असा आग्रह करणाऱ्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. भव्य मंडप व प्रशस्त व्यवस्थेच्या वातावरणामध्ये ही ऐतिहासिक परिषद देवठाण येथे संपन्न झाली.

देवठाण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच एक सभा घेऊन नासिक पुणे रेल्वे पूर्वीच्या मार्गानेच होईल व देवठाण येथे स्टेशन देऊनच रेल्वे पुढे जाईल असे आश्वासन दिले होते. एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्पात याबाबत बदललेला रूट पुनरस्थापित करण्याची घोषणा झाली नाही तर पालकमंत्र्यांच्या या घोषणेला अर्थ राहणार नाही. पालकमंत्र्यांचे आश्वासन खरे ठरावे यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घ्यावी तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना भेटून एक फेब्रुवारी पूर्वी याबाबतचा निर्णय करावा. अर्थसंकल्प मांडताना तशी घोषणा दिल्ली मधून होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. तसे झाले तरच पालकमंत्र्यांच्या आश्वासनाला अर्थ राहणार आहे. असे झाले नाही तर एक फेब्रुवारी नंतर वर्षभर पुन्हा या मागणीसाठी थांबावे लागेल व एक प्रकारे निवडणुकीसाठी दिलेले हे आश्वासन ठरेल. असे होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी युद्ध पातळीवर काम करून दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच संगमनेर येथील एका सभेत देवठाण बोटा स्टेशन बाबत वक्तव्य केले होते. अकोल्यातून रेल्वे गेली तर माझी हरकत नाही, अकोल्याचा स्वित्झर्लंड झाला तरी चालेल, बोगद्या बोगद्याने डोंगरादर्यातून त्यांनी जरूर रेल्वे न्यावी अशा प्रकारचे वक्तव्य करून संगमनेर तालुक्यातील उसाचे नुकसान रेल्वेसाठी झाले तर तुम्हाला चालेल काय असा प्रश्न त्यांनी संगमनेर येथील सभेत संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना केला होता. त्यांच्या ह्या भूमिकेवर परिषदेमध्ये वक्त्यांकडून नापसंती व्यक्त करण्यात आली. संगमनेर तालुक्याला अकोल्याने नेहमीच भरभरून दिले आहे. तेथील ऊस शेती फुलावी यासाठी अकोल्याच्या ऊस शेतकऱ्यांच्या उभ्या शेतामधून पाट जाऊ दिले गेले. संगमनेरला प्यायला पाणी मिळावे यासाठी उभ्या पिकांतून पाईपलाईन संगमनेर शहरापर्यंत पोहोचवण्यात आली. संगमनेर साखर कारखाना फुलावा यासाठी पहिले शेअर्स अकोले तालुक्याने दिले. संगमनेरच्या विकासामध्ये मोठे योगदान अकोले येथील शेतकऱ्यांचे असताना सुद्धा आता थोडीफार झळ घेण्याची वेळ आली तर त्याबाबत थोरात साहेब असं वक्तव्य करणार असतील तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. त्यांनी अकोले करांचे म्हणणे समजून घेण्यासाठी वेळ द्यावा आणि देवठाण बोट्यासह रेल्वे मार्ग व्हावा यासाठी कंबर कसून रणांगणात उतरावे असे आवाहन परिषदेच्या माध्यमातून त्यांना करण्यात आले.

मी स्वतः लवकरच पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटेन तसेच दिल्लीला जाऊन सुद्धा जे शक्य असेल ते सर्व करेल व एक फेब्रुवारी च्या आत रेल्वे येण्यासाठी माझे संपूर्ण योगदान देईल असे आश्वासन यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. 

परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले होते. विनय सावंत यांनी सूत्रसंचालन केले व आपल्या भावना मांडल्या. रेल्वेचा लढा हा भावी पिढ्यांसाठीचा महत्त्वाचा लढा असल्याने यासाठी प्रसंगी वाटेल ते करण्याची तयारी अकोले करांनी ठेवली असून सत्ताधाऱ्यांनी अकोले करांचा अंत पाहू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आंदोलनाच्या मंचावरून केलेली भाषणे ही व्यक्तिगत नसतात. केलेली टीका सुद्धा व्यक्तिगत किंवा संकुचित नसते. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणून मागण्या मान्य करून घेण्याच्या व्यापक भूमिकेतून आक्रमक भाषणे केली जातात. याबाबत सर्वांनी नीट भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक फेब्रुवारी ही दिलेल्या आश्वासन पाळण्याची डेडलाईन आहे. त्याच्या आत दिल्ली मधून निर्णय बदलून आणा असे आवाहन डॉक्टर अजित नवले यांनी केले. तसे झाले नाही तर मात्र व्यापक जन आंदोलन काय असते याचा नमुना अकोले तालुक्यातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एकीकडे एक फेब्रुवारी या तारखेपर्यंत मुदत देत आहोत मात्र दुसरीकडे या कालावधीमध्ये आंदोलनाची व्यापक तयारी केली जाणार आहे. लवकरच बोटा या ठिकाणी 12 तारखेला रास्ता रोको आंदोलन स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केले आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. लागोपाठ लगेच प्रबोधनाची प्रक्रिया पुढे जावी यासाठी कोतुळ व राजुर येथे याच प्रकारच्या दोन परिषदा घेऊन आंदोलनासाठी जनतेला तयार करण्याचे काम पुढे घेऊन जाणार आहोत. सर्व शाळा व कॉलेजेस मधून सत्ताधाऱ्यांना पत्र पाठवणे व प्रभात फेऱ्या काढून विद्यार्थ्यांमध्ये ही मागणी रुजवण्याची प्रक्रिया कृती समितीच्या वतीने केली जाणार आहे. कृती समितीचे सर्व कार्यकर्ते, तालुक्यातील बुद्धिजीवी, पत्रकार, सर्वपक्षीय नेते सर्वांना एकत्र करत एक व्यापक जनआंदोलन आपल्या मागण्यासाठी उभे करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे. राज्यकर्त्यांनी जनतेचा अंत न पाहता एक फेब्रुवारीच्या आत मागणे मान्य केल्याची घोषणा करून एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना ही घोषणा होईल यासाठी काम करावे अन्यथा जनआंदोलनाचा व्यापक सामना त्यांना करावा लागेल हा इशारा यावेळी परिषदेतून देण्यात आला.

महेश नवले, दादा पाटील वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, बाजीराव दराडे, जालिंदर वाकचौरे, उत्कर्षा रूपवते, सुधीर अण्णा शेळके, अरुण शेळके, तुळशीराम कातोरे, सदाशिव साबळे, गिरीजा पिचड, सागर शिंदे, संदीप दातखिळे, विजय वाकचौरे, गणेश ताजने, नीता आवारी, सुमन विरनक, संतोष पापळे, मुकुंद भोर, सीताबाई पथवे, चंद्रमोहन निरगुडे, प्रदीप हासे, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, स्वप्निल धांडे, सुनील उगले यांच्यासह 47 वक्त्यांनी आपले विचार परिषदेमध्ये मांडले. पाच तास प्रदीर्घ विचार मंथन करून रेल्वे कृती समितीने आपली संवाद व संघर्ष याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!