पालकमंत्री विखे गटात नाराजीचा सूर !
सभापती राम शिंदे संगमनेरला आले आणि आमदार तांबे यांच्या घरी गेले….
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे संगमनेरच्या दौऱ्यावर आले होते. आता या दौऱ्याची चर्चा वेगळ्याच कारणाने होत असून शिंदेंचा हा दौरा विखे गटात मात्र नाराजीचा सूर उमटवून गेला असल्याचे बोलले जात आहे. सभापती महोदय संगमनेरला आल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी गेले आणि या भेटीचा सविस्तर वृत्तांत छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर देखील सर्वत्र व्हायरल झाली. त्याचा व्हायचा राजकीय परिणाम झाला आणि सभापती शिंदे यांचे हितचिंतक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात मात्र नाराजीचा सूर उमटला.

सभापती शिंदे आणि विखे पाटील यांच्यातले सख्य सर्वश्रुत आहे. कर्जत जामखेड विधानसभेची निवडणूक असो अथवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक असो सभापतींची निवड असो अथवा नगरपरिषदेच्या निवडणुका असो पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील राजकीय सख्य वारंवार वृत्तपत्रातून सोशल मीडियातून जनतेसमोर आले आहे. त्याची चर्चा देखील झाली आहे.

प्राध्यापक राम शिंदे यांनी याआधीच विखे पाटलांच्या भूमिकेबाबत वेळोवेळी वक्तव्य केली आहेत. त्याचे देखील मीडियातून पडसाद उमटले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय शीतयुद्ध नेहमीच सुरू असल्याचे बोलले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री विखे पाटील यांचा गट आणि भाजपाचा निष्ठावंत गट असे दोन गट निर्माण झाल्याची देखील चर्चा नेहमीच असते. त्यात उभी फूट असल्याचे देखील बोलले जाते. शिंदे यांचे समर्थक कधीकधी उघडपणे विखे पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना दिसतात.

सभापती शिंदे नुकतेच संगमनेरला येऊन गेले आणि या भेटीदरम्यान त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याचबरोबर नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांना देखील शुभेच्छा दिल्या. माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची ही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व भेटीगाठीची चर्चा संगमनेर शहर, जिल्ह्यात झाली. मात्र विखे पाटील गटात या भेटीमुळे नाराजीचा सूर उमटला असून शिंदेंच्या या भेटीबाबत उलट सुलट प्रतिक्रिया आणि चर्चा होत आहेत.

काहींनी तर प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपचे वाटोळे केले आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे संगमनेर अकोले तालुक्यातील भाजपचे पारंपारिक निष्ठावान स्थानिक नेते, पदाधिकारी मात्र विखे गटाच्या नाराजीच्या सुरावर आणि त्यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या आदळ आपट प्रतिक्रियांचा आनंद घेत असून त्यांच्याशी संपर्क केल्यावर ते फक्त चेहऱ्यावर हास्य आणून मौन धारण करीत असल्याचे चित्र आहे. विखेंकडे पगारी नोकर असणाऱ्या व्यक्तींनी देखील सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांनाही ही भेट झाली म्हणजे अतिशय छान झाले असे वाटत आहे.
