संगमनेर तालुक्यातील 17 हजार 967 महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेतून वगळले..
महायुती सरकार बद्दल महिलांमध्ये प्रचंड नाराजी — अर्चना बालोडे
संगमनेर प्रतिनिधी —
निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेसाठी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांचे लाडकी बहीण योजनांचे फॉर्म भरण्यात आले. यानंतर या महिलांना त्याचा लाभही मिळाला. मात्र सरकारने नुकत्याच 17 हजार 967 महिलांना या योजनेतून वगळल्याचे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना बालोडे यांनी सांगितले असून महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा याकरता यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जातो.
महायुती सरकारने 2024 मध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेत तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा याकरता यशोधन कार्यालयातील यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांना याचा लाभ मिळवून दिला. डिसेंबर 2025 पर्यंत महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.

मात्र आता सरकारने विविध कारणे दाखवून योजनेतील 17 हजार 967 महिलांना वगळले आहे. याचबरोबर निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही हवेत विरले असून महिलांना मिळत असलेल्या रकमेतही कपात झाली आहे. अनेक महिलांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. केवायसी करून देखील सुद्धा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर अनेक गरीब महिलांच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा पोर्टलवर येत आहे त्यामुळे पात्र व गरीब महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे.
सरकारने फक्त निवडणुकीसाठी या घोषणा केल्या असून अनेक महिलांना वगळले जात असल्याने संगमनेर तालुक्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

महायुती सरकारने फसवले
निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. ते पैसे तर दिलेच नाहीत, परंतु आहे त्या योजनेतून आम्हाला वगळले आहे. याचबरोबर आम्ही गरीब असून सुद्धा आमच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा येत आहे. हा काय प्रकार आहे कळत नाही. गरिबांना फसवण्याचा प्रकार असल्याची टीका मीना थोरात वडगाव पान येथील शेतकरी महिला यांनी केली आहे.
