उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सत्ताधारी गटात नाराजी !
संगमनेरात अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले !!
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेची एक हाती सत्ता मिळाल्यानंतर उपनगराध्यक्षाची निवड आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सत्ताधारी सेवा समितीमध्ये नाराजीचा सूर उमटलेला असून अनेक इच्छुकांपैकी ज्येष्ठ नगरसेवक देखील नाराज असल्याची चर्चा सध्या शहरात कळीचा मुद्दा ठरली आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी तीन – चार वेळा नगरसेवक झालेल्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी काही जण इच्छुक होते. तर काहींना आपल्या पत्नीला उपनगराध्यक्ष करण्याची तीव्र इच्छा होती. पालिकेचे श्रेष्ठी मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आणि संगमनेर सेवा समितीचे सर्वेसर्वा आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे या मंडळींनी उपनगराध्यक्ष पद मिळावे म्हणून विनंती आणि आग्रह ही केला असल्याचे समजले आहे. मात्र त्यांची विनंती मान्य न करता नूरमोहम्मद शेख यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात आले आहे.

तर स्वीकृत नगरसेवक म्हणून जावेद पठाण सोमेश्वर दिवटे आणि प्रसिद्ध उद्योजक मनीष मालपाणी यांच्या सौभाग्यवती रचना मालपाणी यांची निवड करण्यात आली आहे. यातील दोन निवडीवरून अनेक इच्छुकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून दुसऱ्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी माघार घेतली आहे. स्वतःच्या अपेक्षांचा त्याग केला आहे. तरीही आम्हाला संधी नाकारण्यात आली, याचे दुःख वाटते. अशाही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

सोमेश्वर दिवटे यापूर्वीही नगरसेवक राहिलेले आहेत. तसेच त्यांना पक्षाची मोठी पदे देखील मिळाली आहेत. त्यांचा व्यवस्थित मान राखला जातो म्हणून त्यांच्या ऐवजी नवीन व्यक्तीला संधी मिळायला हवी होती असे मत इच्छुकांपैकी काहींनी आणि त्यांच्या समर्थकांनीही मांडले. आम्ही कायम थोरात तांबे परिवाराशी एकनिष्ठ राहिलो आहोत असेही काहींनी म्हटले. तर विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी अत्यंत छुप्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोध करून त्यांच्या पराभवाचे कारण झाले अशा व्यक्तींना देखील नगरसेवक पद देण्यात आले. त्यांना स्वीकृत म्हणून नगरपालिकेत घेण्यात आले असे देखील बोलले जात आहे. याबद्दलही कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियातून आणि व्हाट्सअपच्या काही ग्रुपमधून तशा प्रतिक्रिया आणि चर्चा देखील झाल्या.

मुस्लिम समाजातून जावेद पठाण यांना स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळाली याबद्दल मात्र जास्त पडसाद न उमटता त्यांच्या स्वीकृत सदस्य पदाला स्वीकारण्यात आले असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र पालिकेची एक हाती सत्ता मिळाली असली तरी उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी टाकून गेली असल्याचे बोलले जात आहे.

नवीन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांना आता प्रत्यक्ष सभागृहात कामकाज सुरू करावे लागणार आहे. सभागृहात त्यांच्याच सत्तेतल्या काही मुरलेल्या आणि अनुभवी सदस्यांचा त्यांना सामना करावा लागतो की काय अशी शंका आता उपस्थित व्हावे होऊ लागली आहे. सभागृहातील कामकाजाची छुपी माहिती नाराज गटाकडून विरोधकांना पोहोचवली जाऊ शकते इथपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. आता प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर खरे चित्र समजेल असेही काही जणांचे मत आहे.
