सत्तेसाठी काही पण हे राज्यातील जनतेला मान्य नाही — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
कोल्हापूर, सांगली, पुणे येथे महानगरपालिका निवडणुकीनिमित्त जाहीर सभा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क कोल्हापूर
राज्यभरात सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीत पक्षांतर आणि निष्ठावंतांना डावलण्याची प्रक्रिया यामुळे महाराष्ट्रामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पक्ष फोडाफोडी करून भाजपने राजकारण नासवले आहे. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपचा हा उद्योग राज्यातील जनतेला मान्य नसून पुन्हा समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी दौरा केला आहे.


कोल्हापूर, सांगली, मिरज, पुणे, पलूस, केडगाव, कोथरूड येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा व प्रचार रॅली केली यावेळी समवेत खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या मंडळींनी फोडाफोड करून राज्यातील राजकारणाचा बट्ट्याबोळ केला आहे. यापूर्वी असा अभूतपूर्व गोंधळ कधीही नव्हता. कोण कोणत्या पक्षात आहे कळायला तयार नाही. विचारधारा राहिली नाही. सत्तेसाठी सर्वजण विचारधारा सोडत आहे. हाणामाऱ्या सुरू आहेत. पैशांची आमिष दाखवले जात आहे. निवडणुकांमध्ये 70 उमेदवार बिनविरोध कसे काय होऊ शकतात असा प्रश्न विचारताना सध्याचे सुरू असलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला विचारधारा आहे. सुसंस्कृत चांगल्या राजकारणाची परंपरा आहे. मात्र सध्याचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका करून सत्ते करता धडपडणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, चुकीचे राजकारण थांबवून विचारधारा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. महाविकास आघाडी राज्यभरात चांगले यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर आमदार बंटी पाटील म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेसाठी आपण सातत्याने काम करत आहोत. तर खासदार शाहू महाराज म्हणाले की, जनता काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहणार असून यावेळी कोल्हापूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार आहे. तर माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले की, सांगलीमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असून विरोधकांची पानिपत होईल. याप्रसंगी आमदार जयंत पाटील, आमदार जयंत तासगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, हरिदास सोनवणे आदी उपस्थित होते.
