निवडणुकांमधला राजकीय धुमाकूळ महाराष्ट्राच्या हिताचा नाही — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर प्रतिनिधी —
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीने मत मतांतरे, सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष दिला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील विदारक चित्र समोर आले आहे. विविध पक्षांमध्ये तिकिटावरून झालेला गोंधळ. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय. बाहेरच्यांना संधी आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष, भांडण, तंटे अगदी जीव घेण्यापर्यंत मारामारी हा काय धुमाकूळ राज्यात चालला आहे. असे कधीही नव्हते कुठे चाललाय महाराष्ट्र अशी चिंता व्यक्त करताना असे राजकारण महाराष्ट्रासाठी चांगले नसून संगमनेरची संस्कृत राजकारणाची परंपरा आपल्याला जपायची असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदभार ग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वास मुर्तडक, कैलासराव लोणारी, नगरसेवक सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, सौरभ कासार, शोभाताई पवार, प्राची काशीद, किशोर पवार, अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दिपाली पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, विजया गुंजाळ, शेख शकीला, शेख नूर मोहम्मद, सरोजना पगडाल, डॉ. दानिश, किशोर टोकसे, प्रियांका शाह, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्य अधिकारी पेखळे, राजेंद्र गुंजाळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकनेते थोरात म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मत मतांतरे असतात. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये काय धुमाकूळ सुरू आहे. महानगरपालिकेच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थिती आपण पाहत आहोत अशी परिस्थिती कधीही नव्हती कुठे चाललाय महाराष्ट्र याची चिंता आहे. राजकारण हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करायचे असते मात्र सध्या सत्तेसाठी सुरू असलेली चढाओढ दुर्दैवी आहे.

1991 मध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून काम सुरू केले. तेव्हापासून नगरपालिका ही अत्यंत आदर्श पणे चालली. अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लागली. हॅपी हायवे च्या उद्घाटनाच्या वेळी सर्व संगमनेरकर आनंदी होऊन एकत्र आले मात्र काही लोकांनी त्यावेळेस रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. आपण संगमनेर बस स्थानक सुंदर बनवले. मागील एक वर्षात ‘आम्हाला ओळखा’ यासाठी अनेकांनी फ्लेक्स लावले. बस स्थानकाचे विद्रूपीकरण केले.
स्वच्छता, बंधुभाव, एकात्मता ही आपली संस्कृती आहे. आपण कुणाचाही द्वेष करत नाही. राज्यात सर्वाधिक मोठा विजय मिळाला असून या विजयाचे श्रेय संगमनेर मधील सर्व जनतेला आहे. आपण जे काम करतो ते अत्यंत प्रामाणिक करत असतो. जनतेने मोठा विश्वास टाकला असून संगमनेर शहरातील जनता, आनंदी सुखी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा अशा सूचना दिल्या.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला जसे मूलभूत अधिकार असतात तसेच मूलभूत कर्तव्य सुद्धा असतात. संगमनेर शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध असून यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यापुढील काळात प्रत्येक नगरसेवकाचे काम व त्याचे मूल्यमापन ही नागरिकांना घरपोच केले जाणार आहे. नगरपालिकेचे ऑडिट आणि बॅलन्स शीट सुद्धा वेबसाईटवर टाकले जाणार आहे. काही लोकप्रतिनिधींनी अर्धवट माहितीच्या आधारे निवडणूक काळात भाषणे केली. नगरपालिकेला फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न असून साधारण 165 कोटी रुपये खर्च असतो 150 कोटी रुपये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळवावे लागतात असे ते म्हणाले. नागरिकांशी चर्चा करून प्रभाग समिती नियुक्त करून त्या विभागामध्ये करावयाची कामे जनतेच्या सहकार्याने करू असे तांबे यांनी सांगितले. याचबरोबर शहरातील बेशिस्त गोष्टीला आळा घालण्यासाठी काही कटू निर्णय करावे लागतील पार्किंग त्याचबरोबर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

राजेश मालपाणी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहराला सुसंस्कृत परंपरा आहे. चांगले काम डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वात पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सरोजना पगडाल, प्राची शहा जर्मनीच्या खासदार क्लोडिया नॉलटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले. तर प्रमिला अभंग यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छतेबाबत कौतुक तर स्टॅंडवर होणाऱ्या फ्लेक्स बाजी बाबत नाराजी
आपण संगमनेर शहरात अद्यावत बस स्थानक निर्माण केले. या बसताना कव्हर मागील एक वर्षात अनेकांनी स्वतःची ओळख व्हावी म्हणून फ्लेक्स लावले. काही फ्लेक्स उलटे झाले. अनेक दिवस लोंबकळत होते. तरीही फ्लेक्स काढले नाहीत. आम्हाला ओळखा यासाठी हे फ्लेक्स होते. अशी टीका करताना संगमनेर सेवा समितीने सुरू केलेले स्वच्छतेचे काम कौतुकास्पद आहे. हा इव्हेंट न करता ही संस्कृती जपा असा सल्ला लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिला
संगमनेरचा ट्रेंड राज्यात राबवला जातो
सेवा समितीने सुरू केलेले स्वच्छता अभियान नंतर राज्यभर सुरू झाले आणि त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू झाली. संगमनेरचा प्रत्येक उपक्रम हा राज्यासाठी ट्रेंड ठरणारा असून राज्यातील आदर्शवत नगरपालिका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
