एसएमबीटी हॉस्पिटलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
एनएबीएच मानांकनाने उत्कृष्ट दर्जा आणि परवडणारी आरोग्यसेवा पुन्हा चर्चेत
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक —
आरोग्यसेवा जितकी उत्तम, तितकीच ती महागडी असते, हा समज आता एसएमबीटी हॉस्पिटलने खोटा ठरवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या ‘एसएमबीटी’ला नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील NABH (National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers) मानांकन प्राप्त झाले आहे. रुग्ण सुरक्षा, क्लिनिकल क्वालिटी, पेशंट अधिकारांना जपणारी आणि पारदर्शक उपचार पद्धतीचा हा राष्ट्रीय गौरव असून, जागतिक दर्जाची आरोग्यसेवा ही परवडणाऱ्या दरातही मिळू शकते, हे एसएमबीटी हॉस्पिटलने सिद्ध केले आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरजू रुग्णांना पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने एसएमबीटी हॉस्पिटलची स्थापना झाली. अनेकदा ‘NABH’ मानांकन असलेल्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. मात्र, एसएमबीटीने जागतिक दर्जाचे बदल करत असताना त्याचा आर्थिक भार रुग्णांवर पडू दिला नाही. सरकारी योजना, चॅरिटेबल सपोर्ट आणि संस्थात्मक सवलतींच्या माध्यमातून अत्यल्पदरात किंवा मोफत उपचार करण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या शहरांतील मोजकीच नामांकित मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स या श्रेणीत येतात. मात्र, ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर असूनही एसएमबीटीने या महानगरांच्या तोडीची गुणवत्ता राखली आहे. येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि इम्म्युनोअॅक्ट सारख्या संस्थांशी करार असल्याने, ग्रामीण रुग्णांनाही प्रगत उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले आहेत.
एसएमबीटी हॉस्पिटल परवडणारी आरोग्यसेवा हे ब्रीदवाक्य सोबत घेऊन शासकीय यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले आहे. या कारणामुळेच महाराष्ट्रात योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या रुग्णालयांत हॉस्पिटलचा तिसरा क्रमांक आहे. भक्कम पायाभूत सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञांची उपलब्धता असलेले व समृद्धी महामार्गावर वसलेले हे १२०० बेड्सचे भव्य हॉस्पिटल आज अनेक रुग्णांची ‘लाईफलाईन’ ठरत आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये दररोज ८०० ते १००० रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार होत आहेत, तर ७०० ते ८०० रुग्ण आंतररुग्ण विभागात (आयपीडी) उपचारासाठी दाखल असतात. दररोज १०० ते १५० रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो. तर तितकेच रुग्ण दर दिवशी याठिकाणी उपकारासाठी दाखलदेखील होतात.

अनेकदा मेडिकल कॉलेज म्हटले की, शिकाऊ डॉक्टर, उपचारांत दिरंगाई असे म्हटले जाते. मात्र, एसएमबीटीने या सर्व गोष्टींवर मात करत एनएबीएच मानांकनावर मोहोर उमटवली आहे. इन्फेक्शन कंट्रोल, क्लिनिकल गव्हर्नन्स आणि सातत्यपूर्ण क्वालिटी ऑडिट यामुळे याठिकाणी रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ‘नर्सिंग एक्सलन्स’ आणि ‘डिजिटल एनएबीएच’ हे मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. या यशाबद्दल हॉस्पिटलची ऑपरेशन टीम, क्वालिटी टीम, नर्सिंग टीम व सिक्युरिटी सिस्टिम यांच्यासह हॉस्पिटलशी निगडीत प्रत्येक घटकाचे आभार याप्रसंगी मानले.

रुग्ण-केंद्रित व्यवस्था उभारली
ग्रामीण भागातील कुठल्याही रुग्णाच्या हॉस्पिटलमधील प्रवेशापासून ते डिस्चार्जपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया ही पारदर्शक करण्यात आली आहे. रुग्ण सन्मान आणि सुरक्षितता यावर आधारित कार्यपद्धती अंगिकारली आहे. क्लिनिकल ऑडिट आणि सततच्या प्रशिक्षणाद्वारे उपचारांचा दर्जा खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या तुलनेत अधिक चांगल्या पद्धतीने उंचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– डॉ.मीनल मोहगांवर, अधिष्ठाता SMBT

सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल लवकरच
एसएमबीटी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेचा विस्तार होत असून येत्या वर्षभरात सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल सेवेत दाखल होणार आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी उपचारांसाठी स्वतंत्र विंग, पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपीची सुविधा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, या केंद्रासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत तांत्रिक मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण करार असल्यामुळे टाटा हॉस्पिटलच्या तज्ज्ञांची उपस्थिती आणि मार्गदर्शनासह विशेष प्रशिक्षित सपोर्टिंग स्टाफ याठिकाणी कार्यरत असेल.
– सचिन बोरसे, मुख्य कार्यकारी अधिकारी SMBT
