संगमनेर बस स्थानकावर दोन लाखाचे मंगळसूत्र चोरले !
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर बस स्थानकावरील चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शहरात विविध ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू असतानाच मंगळसूत्र चोरी पाकीट मारी असले प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. शहरातील बस स्थानकावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले असून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे हे मंगळसूत्र चोरीला गेले आहे.

आशालता मनोहर आहेर (राहणार घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी बस स्थानकावर ही चोरी झाली असून त्यामध्ये दोन तोळे पेक्षा जास्त वजन असलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले आहे.

फिर्यादी महिला आणि फिर्यादीचे पती हे नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेर येथून अकोले येथे जात असताना संगमनेर बस स्थानकावर या मंगळसूत्राची चोरी करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल हासे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
