रेल्वे पळवली, आता संगमनेरचे पाणी पळवण्याचा त्यांचा डाव — आमदार सत्यजित तांबे
संगमनेर शहरात सेवा समितीची अभूतपूर्व प्रचार रॅली !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या सांगता प्रसंगी सेवा समितीने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीमध्ये संगमनेर मधील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी संगमनेर मधील मेन रोड बाजारपेठ संगमनेर बस स्थानकासह सर्व परिसर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गजबजुन गेला अभूतपूर्व रॅलीने प्रचाराची सांगता हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

जाणता राजा मैदान येथून सुरू झालेल्या प्रचार रॅलीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, उद्योजक मनीष मालपाणी यांच्यासह विविध नागरिक मतदार सहभागी झाले.
जाणता राजा मैदान, संगमनेर बसस्थानक, मेन रोड, बाजारपेठ अशा सुरू झालेल्या रॅलीमध्ये संगमनेर शहरातील तरुण व महिलांची संख्या मोठी होती. सर्वत्र सिंहाचे फोटो आणि चेहऱ्यावर प्रचंड उत्साह मोठी गर्दी हे या रॅलीचे वैशिष्ट्य होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.

या रॅलीमध्ये बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बाहेरील लोकांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे आणि ते संगमनेर मधील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून येथील विकास मोडून पाहत आहे. रेल्वे पळवली, आता संगमनेर शहरातील पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे. आणि हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे याकरता ही नगरपालिका त्यांना ताब्यात पाहिजे. विकास करण्याची धमक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले आहे. आता संगमनेरकर एकवटले आहेत. आपल्या गावासाठी शहरासाठी एकवटले आहे. सेवा समिती पुढील पाच वर्षाचे व्हिजन घेऊन अत्यंत काटेकोरपणे काम करणार असल्याचे ते म्हणाले.
