केंद्रापासून राज्यापर्यंत निवडणूक आयोग सत्तेप्रमाणे चालतोय

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात निवडणूक आयोगाचा इतका गोंधळ प्रथम पाहत आहे. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांना असायचा, कोणाचा हस्तक्षेप नसायचा, सत्ताधारी देखील घाबरायचे. मात्र, आता केंद्रापासून राज्यापर्यंत आयोग सत्तेप्रमाणे चालत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

अवघ्या एका दिवसावर मतदान प्रक्रिया जवळ आलेली असताना निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरात माध्यमांच्या प्रतिनिधींनी माजी मंत्री थोरात यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. आयोगाने दिलेला निवडणूक कार्यक्रम

अत्यंत चुकीचा असून, शंकेला वाव असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढू नका असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही आयोग कसा वागतो ही काळजीची गोष्ट आहे. अचानक निवडणुका रद्द करणार किंवा अचानक पुढे ढकलणार या सगळ्यांचा जनतेवर काय परिणाम होतो याचा विचार करत नाही. खरेतर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका घेणे अपेक्षित होते. एकंदरीत हा निवडणुकीचा कार्यक्रम आखताना आयोगाच्या चुका आहेत. परंतु, त्याचे प्रायश्चित्त जनतेने का भोगावे असा प्रश्न केला. खरेतर ही निरोगी व्यवस्था असली पाहिजे परंतु तसे घडत नाही. त्यामुळे यास कोणाला तरी जबाबदार धरले पाहिजे आणि त्या जबाबदारालाच शिक्षा झाली पाहिजे असे म्हणाले.

निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला असल्याचा गंभीर आरोप करत प्रत्येकजण काहीतरी सूचना करेल आणि आयोग त्याप्रमाणे आखणी करत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. ज्यांची निवडणूक वीस दिवस पुढे गेली त्याची जबाबदारी कोणावर आहे? अगदी नगराध्यक्षांची देखील पुढे ढकलली. त्यामुळे नेतृत्व असणाऱ्या पदाचीच पुढे ढकलल्याने ही निवडणूक होणार कशी असे अनेक प्रश्न माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!