पहिला नगर मनमाड रस्ता पूर्ण करा करा, मग संगमनेरच्या विकासाच्या बाता मारा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विखेंना टोला 

संगमनेरची जनता बनवाबनवी चांगलीच ओळखते 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

मागील तीस वर्षात संगमनेर नगरपालिकेला शिस्त लावली आदर्श नगरपालिका म्हणून काम केले .शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवले .सातत्याने विकासाचा योजना राबवल्या. शहर विकसित केले. मात्र आता काहीजण पूर्णवेळ टोल वसुलीच्या मागे लागली आहे. तर पहिला नगर मनमाड रस्ता पूर्ण करा आणि मग संगमनेरच्या विकासाच्या भाता मारा असा टोला लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विजय यांचे नाव न घेता लगावला आहे. महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर, नद्या मंजूर असे सांगत असून बनवाबनवी आणि निवडणुकीसाठी वेगवेगळे फंडे हे त्यांचे वैशिष्ट्य असले तरी संगमनेरचे जनता सगळे ओळखते. अशी उपरोधिक टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने नाशिक पुणे रोडवर मार्केट कमिटी समोर जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिली तांबे, हिरालाल पगडाल, इसहाकखान पठाण, प्रमिला अभंग, यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की संगमनेर सेवा समितीच्या वतीने 11 जुने व नवीन वीस चेहऱ्यांना नगरपालिकेत संधी दिली आहे. मागील तीस वर्षात अत्यंत आदर्श पाणी नगरपालिका चालवली. उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण केले, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले. सातत्याने निधी मिळवला. 38 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण केली. शहरांमध्ये पाईपलाईनचे नवे जाळे निर्माण केले. टाक्या निर्माण केल्या. आणि त्यामुळे संगमनेर शहरात स्वच्छ पाणी मिळत आहे .यामागे कुणाचे तरी कष्ट आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. संगमनेर बस स्थानक सह विविध रस्ते पूर्ण केले. बायपास पूर्ण झाला त्यावर आता काँक्रिटीकरण सुरू आहे. शहरांमध्ये वैभवशाली इमारती निर्माण केल्या. 35 गार्डन उभारल्या. एका दिवसात झाले नाही तर त्यासाठी कष्ट केले आहे.

ही विकासाची परंपरा आपण जपली आहे. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर मध्ये अस्वस्थता वाढली आहे. ड्रग्स आणि अमली पदार्थ मिळत आहेत. यांना कुणाचे अभय आहे. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होत आहेत गुंडगिरी वाढली आहे हे कोणाच्या आशीर्वादाने हे लक्षात घ्या.

आपण मंजूर केलेली रेल्वे बाहेरून जाते आहे आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून गप आहे. प्रत्येक कामात टोल वसुली सुरू आहे.

काल उपमुख्यमंत्री संगमनेर मध्ये येऊन काही मंत्र्यांना फोन लावून विकासाचे आश्वासन देऊन गेले. असे आश्वासने त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिले याचे प्रात्यक्षिक स्वतः माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना ऐकवले. तर महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर ,नद्या मंजूर जे मागाल ते मंजूर अशी बनवाबनवी करत आहे.

अगोदर नगर मनमाड गचक्यांचा रस्ता पूर्ण करावा आणि मग संगमनेर मध्ये या आणि संगमनेरच्या विकासाच्या वाता मारा असा टोला आहे थोरात यांनी लगावला.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात खूप चांगले काम झाले आहे. मात्र मागे एक वर्षापासून वातावरण बिघडले आहे. परंतु निवडणुकीनंतर संगमनेर मध्ये एकही अनाधिकृत फ्लेक्स लागणार नाही किंवा कोणताही कार्यक्रम रस्त्यावर होणार नाही. संगमनेरला 50 ते 150 टीडीएसचे शुद्ध पाणी मिळत आहे. पुढील काळामध्ये एकाच वेळेस पूर्ण दाबाने पाणी मिळेल. यासाठी काम केले जाणार आहे.

काल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी भाषण केले त्यांना कोणीतरी कानात सांगत होते .परंतु एप्रिल 2025 मध्ये मी एमआयडीसीसाठी पत्र दिले. आणि त्याचे उत्तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी मिळाले सर्वेचे काम सुरू आहे. दुसरा फोन आरोग्यमंत्र्यांना केला तर हे काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 28 जानेवारी 2020 रोजी मंजूर करून ठेवले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक पुणे रेल्वे साठी पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा न करता शेजारच्यांना समजून सांगावे असा टोला त्यांनी लगावला. तर संगमनेर 2.0 हा जाहीरनामा राबवण्याचा आपला शब्द असून महाराजांचा अश्वारूढ पुतळा व आरक्षण मुद्दा पुढील एक वर्षात मार्गी लावणार असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.

तर डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेर मध्ये खूप विकास झाला आहे मात्र विरोधकांच्या डोळ्यांना तो दिसत नाही. चिलट प्राणी गडबड करायला लागले की तेव्हा सिंह बाहेर येतो. समोरचे लोक ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड, इसहाक खान पठाण, हिरालाल पगडाल सोमेश्वर दिवटे यांची भाषणे झाली. संगमनेर मधील नागरिक महिला युवक व प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याने हीं मोठी सभा ठरली.

टायगर स्वार्थी असल्याने एकटा येतो तर जंगलचा राजा सिंह सर्वांना घेऊन येतो.

कालच्या सभेमध्ये कोणीतरी टायगर आला होता. असे म्हटले टायगर हा एकटा येतो कारण तो स्वार्थी असतो सिंह हा जंगलचा राजा असतो. तो सर्वांना बरोबर घेऊन येतो असा टोला आमदार सत्यजित तांबे यांनी नाव न घेता लगावला. याचबरोबर राजकीय कार्यकर्त्याचे भाषण हे मुद्द्याचे असावे करमणुकीचे नसावे असेही ते म्हणाले.

संगमनेर 2.0 जाहीरनामा प्रसिद्ध

संगमनेर मधील नागरिकांनी एकत्र येऊन संगमनेर सेवा समिती स्थापन केली असून पुढील पाच वर्षात करावयाच्या कामांचा जाहीरनामा आमदार सत्यजित तांबे यांनी प्रसिद्ध केला याचबरोबर हा जाहीरनामा राबवण्याचा आपला शब्द असून या कामासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही कारण माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या पाठीशी आहेत त्यांचा शब्द हा प्रत्येक मंत्र्यासाठी अत्यंत आदराचा असल्याचे आमदार सत्यजित तांबे आणि सांगताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!