हरिश्चंद्रगडावर आता प्रकाशाचे झाड !
सौर वृक्ष बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
महाशिवरात्रीच्या दिवशी हरिश्चंद्रगड जळण्याची शक्यता !

प्रतिनिधी —
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गिर्यारोहकांचे व निसर्गप्रेमींचे श्रद्धास्थान म्हणून गणल्या जाणाऱ्या हरिश्चंद्र गडावरील मंदिर परिसर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. महाशिवरात्रीच्या तोंडावर हा प्रकल्प पूर्ण झाला तर महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवाचा हा पर्वत दिव्यांचा लखलखाटाने उजळून निघणार आहे.
हरिश्चंद्रगड वन्यजीव विभाग या गडावर प्रत्येकी सुमारे १ हजार ५०० वॅटचे तीन ‘सोलर ट्री’ युनिट उभारणार असून सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेला आणि समुद्र सपाटी पासून ४ हजार ६७० फूट उंचीचा असणारा हरिश्चंद्र गड.या गडाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभल्याने गडावर भाविकांचा राबता कायमच असतो.
येथील निसर्ग सौंदर्य, मंदिरे, गुहा, शिलालेख, कोकणकडा यामुळे तीनही ऋतूत येथे पर्यटकांची रेलचेल असते. भाविक आणि पर्यटक या गडावर अनेक वेळा मुक्कामी असतात. मात्र अद्यापपर्यंत या गडावर वीज पोहचलेली नसल्यामुळे गडावर रात्रीच्या वेळी अंधारच असतो.

काही वर्षांपूर्वी महावितरण कंपनीने या गडावर विद्युत पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यात अनेक अडचणी आल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. आता वन्यजीव विभागाने यात लक्ष घातल्याने गडावरील विजेचा प्रश्न सुटणार असून हरिश्चंद्रगड सोलर च्या दिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या अधिक संधीही उपलब्ध होणार आहे.
उभारण्यात येणारे प्रत्येक युनिट वाय आकाराचे असेल. याच्या तीन मीटर मध्यावर डाव्या बाजूस चार मीटरचा तर उजव्या बाजूस साडे चार मीटरचे पिलर असणार असून यावर एकूण ३९५ वॅटचे चार पॅनल बसविण्यात येणार आहेत. या युनिट मध्येच दीड किलो वॅटच्या आणि पाच वर्षे हमी असणाऱ्या दोन बॅटऱ्या बसविण्यात येणार आहेत. यानुसार आता गडावर तीन सोलर ट्री उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होताच हरिश्चंद्रगड सोलरच्या दिव्यांनी उजळून निघणार आहे.

गडावर वीज उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिकांनी वन्यजीव विभागास आग्रह केला. त्यानुसार या विभागाने पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक नियोजनातून यासाठी निधी उपलब्ध केला. यानुसार या सर्व युनिटचे सुटे भाग पाचनई येथे आणण्यात आले. हे गडावर नेण्यासाठी अगोदर कोणी तयार होईनात. असे पाहून नाशिक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल डी डी पडवळे, अमोल आडे, वनपाल शंकर लांडे यांनी गडावर एक दिवस मुक्काम ठोकला. सकाळी गड उतरून खाली आल्यानंतर ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या आणि पर्याय शोधण्यास सांगितले. हो ना करत ग्रामस्थांनी सुमारे८०० किलो वजनाचे हे साहित्य एकीचे बळ दाखवत ते सर्व सुटे भाग कसरत करत गडावर पोहचविले. त्यानुसार आता गडावर तीन सोलर ट्री उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

यातील एक युनिट हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरा समोर तर दुसरे युनिट गणपती गुहेच्या समोर उभारण्यात येणार असून तिसरे युनिट कोकणकडा किंवा केदारेश्वर लिंगा च्या मंदिराच्या समोर उभारायचा निर्णय घेण्यात येणार आहे.
