मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी सत्यजीत तांबे यांनी घेतला पुढाकार
सांस्कृतिक कार्यमंत्री यांना लिहिलेले पत्र…

लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी वेळी झालेल्या अपमानामुळे ऐरणीवर आला प्रश्न
प्रतिनिधी —
स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीच्या वेळी राज्यातील मराठी कलावंतांना अंतिम दर्शनासाठी प्रवेश नाकारल्यामुळे राज्यात नाराजी व्यक्त होत होती. तसेच मंगेशकर यांच्या अंत्यविधीला मराठी कलाकार उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांच्यावर टीकाही होत होती.
या सर्व प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत होते. काही मराठी कलावंतांनी सोशल मीडियामधून वस्तुस्थिती मांडल्यानंतर खरी वस्तुस्थिती समोर आली.

महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आता मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी पुढाकार घेतला असून सांस्कृतिक कार्य मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, मुंबईत घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार सातत्याने घडतात. अगदी कला क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम असेल तरीही तेथे बॉलीवूडमधील कलाकारांना प्राधान्य दिले जाते.
मराठी कलाकारांना नेहमी याला सामोरे जावे लागते. भारतीय चित्रपटसृष्टीची उभारणी मराठी माणसाने केलेली आहे. चित्रपट सृष्टीची पंढरी मुंबई महाराष्ट्रातच आहे. तरीही येथे मराठी कलाकारांना तुच्छ वागणूक मिळते. हे उचित नाही.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य खात्याने स्वतःच्या चौकटी बाहेर येऊन मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी व उदयन्मुख कलाकारांच्या प्रश्नांवर विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांना योग्य सन्मान मिळवून देणे गरजेचे आहे. वरील प्रसंग उद्भवेल तेव्हा किंवा इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सरकार व मराठी कलाकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम सांस्कृतिक कार्य खात्याने करणे आवश्यक आहे.
याचा गांभीर्याने विचार करून पुढील काळात असे प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी देखील तांबे यांनी केली आहे.

