आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही — आमदार डॉ. लहामटे
विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न तातडीने सोडवा — डॉ. जयश्री थोरात
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 17 —
घुलेवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय विश्रामगृह येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार किरण लहामटे, व डॉ. जयश्री थोरात यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी त्यांनी समजावून घेतल्या याप्रसंगी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे आदिवासी विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ, प्रकल्पा अधिकारी देवकन्या बोडके आदी उपस्थित होते.

संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र असून संगमनेर व अकोले तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा मिळावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून घुलेवाडी येथे भव्य व अद्यावत आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह निर्माण करण्यात आले आहे. वस्तीगृहामध्ये आदिवासी विभागाच्या वतीने निधीची कमतरता दिसत असून विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील दुरवस्था व आपल्या सुविधांबाबत 7 ऑगस्ट रोजी आदिवासी विभागाकडे मागणी केली होती. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता.

यामध्ये वस्तीगृहाला रंगरंगोटी करावी, प्रवेश क्षमता वाढवावी, नवीन इमारत बांधावी, 5 किलोमीटर पेक्षा दूर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्च मिळावा, नवीन संगणक मिळावे, अद्यावत स्टडी रूम असावी, लाईट दुरुस्ती करावी, विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व्यवस्था असावी, वस्तीगृहामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये वाढ व्हावी. ग्रंथालयामध्ये पुस्तकांची वाढ व्हावी. व्यायामशाळा असावी, खेळाची सुविधा निर्माण करावी अशा विविध मागण्या केल्या आहेत.

मात्र या मागण्या पूर्ण होत नसल्याने मागील दोन दिवसापासून 250 विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला डॉ. जयश्री थोरात यांनी भेट दिली यावेळी त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना सर्व चांगल्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत तो त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने समिती वगैरे असे कारण न सांगता तातडीने सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. मुलींच्या वस्तीग्रहाचे अनेक प्रश्न आहेत तेही तातडीने सोडवावेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आपण या विद्यार्थ्यांसोबत आहोत असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्याशी फोनवर संपर्क साधून तातडीने या विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडवण्याची विनंती केली.

आमदार लहामटे म्हणाले की, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. वस्तीगृहाची क्षमता वाढून घेण्यासाठी पाठपुरावा करा. संगमनेरला विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जवळ इमारत शोधून तेथे विद्यार्थ्यांची व्यवस्था करा. प्रकल्पाच्या अंतर्गत काही मान्यता लागल्या त्या तातडीने मिळवून देऊ. अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून त्यांना होणाऱ्या त्रासाला प्रकल्प कार्यालय जबाबदार असल्याचे ते म्हणाले. या गरजा तातडीने पूर्ण झाल्या पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी अजय फटांगरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
