संग्राम भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल करा !
संगमनेर मधील सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी व दंगली घडविण्यासाठी केला जात असून संगमनेर मध्ये नुकतेच त्याचे प्रदर्शन घडले आहे. चिथावणीखोर प्रक्षोभक भाषा वापरून धमक्या देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक आणि प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घुलेवाडी या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 16 ऑगस्ट 2025 रोजी संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेले होते. सदर कीर्तनामध्ये धर्मकार्य धर्मप्रचार या नावाखाली सर्वधर्मसमभाव धर्मनिरपेक्षता या घटनेतील संविधानिक मूल्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करून त्याच वेळेला वापरलेली भाषा ही चिथावणीखोर असून अन्य धर्मीयांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करणारी व दंगलीस कारणीभूत होऊन सामाजिक शांतता बिघडणारी भाषा वापरण्यात आलेली आहे.

खरे तर वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे की वारकरी संप्रदायात कीर्तनाच्या व्यासपीठावरून समाज प्रबोधन व समाजात एकात्मता सुलोखा वाढवण्यासाठी चे कार्य करण्यात येत असते अशा सगळ्या पार्श्वभूमीवर घुलेवाडी या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संग्राम बापू भंडारे यांनी जी काही भाषा वापरली ती अशोभनीय असून भारतीय संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवणारी भाषा आहे व समाजामध्ये अशांतता तसेच दंगल घडून आणण्यासाठीची भाषा वापरण्यात आलेली आहे या भाषेचा व अशा प्रकारच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशी भाषा वापरत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्याबद्दल रोखले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून सत्तेचा गैरवापर करत या गुन्ह्यांमध्ये न घडलेल्या गोष्टीच्या कहाण्या तयार करून खोटे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून घेऊन एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

त्यामुळे पोलीस प्रशासनाने कोणत्याही खोट्या गुन्ह्यांना प्राधान्य न देता घडलेली गोष्टीची शहानिशा करून व समाजामध्ये द्वेष पसरणार नाही भीती पसरणार नाही व वाईट गोष्टीला प्रोत्साहन मिळणार नाही अशा प्रकारची चौकशी करून ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई करणे आवश्यक आहे खऱ्या-खोट्याचा नीट तपास करून खोटे गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांच्यावर किंवा जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर निपक्षपातीपणे पोलिसांनी कारवाई करावी त्याचप्रमाणे व्यासपीठाचा गैरवापर करून समाजात द्वेष पसरविणे दंगली घडविण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करणे अशा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही याची देखील योग्य ती समज कारवाई करून देणे आवश्यक आहे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याकडे करत आहे कोणत्याही राजकीय किंवा सत्तेच्या दबावला बळी न पडता पोलिसांनी पोलिसांचे काम निरपेक्षपणे संविधानाच्या चौकटीत करावे ही मागणी ह्या निवेदन निवेदनाद्वारे आम्ही आपणाकडे करत आहोत.

यावेळी राष्ट्रसेवादलाचे माजी कार्यध्यक्ष राजाभाऊ अवसक, अनिसच्या माजी कार्यध्यक्ष वकील रंजना गवांदे, विठ्ठल शेवाळे, जयसिंग सहाणे, वकील समीर लामखडे, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अजीजभाई ओहरा, श्रीनिवास पगडाल, छात्रभारतीविद्यार्थी संघटनेचे अनिकेत घुले, रजत अवसक, संभाजी ब्रिगेडचे राम अरगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
