अहिल्यानगर शहर पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात — खासदार निलेश लंके
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दिनांक 2 –
अहिल्यानगर शहरातील पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली काम करत असून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जनतेचा पोलिसांवरचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. असा स्पष्ट आरोप खासदार निलेश लंके यांनी केला असून अहिल्यानगर शहर पोलिसांच्या वादग्रस्त कारभारासंबंधीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( विक्रम हे माजी मंत्री व शिवसेना उपनेते दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे सुपुत्र आहेत.) हे प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरले आहे. फिर्यादी व्यक्तीचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी आहे, असे खासदार लंके यांनी निवेदनात म्हटले आहे. सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या फिर्यादी व्यक्तीच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिस त्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते.

खासदार निलेश लंके यांनी पोलिस प्रशासनाच्या पक्षपाती आणि संशयास्पद कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गृह विभागाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. “विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत. तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱ्यांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे. असे खासदार लंके यांचे म्हणणे आहे.
