विविधतेतून एकता हीच भारताची खरी ताकद — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अमृत उद्योग समूहात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16 —
1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून सातत्याने देशभक्तांनी केलेल्या संघर्ष, त्याग आणि आत्मबलिदानातूनच हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहत असून अनेक बोलीभाषा व वेशभूषा आहेत. विविधता हे वैशिष्ट्य असतानाही राष्ट्रीय एकात्मता व विविधता हीच खरी देशाची ताकद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत उद्योग समूहाच्या वतीने झालेल्या 79 व्या ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, डॉ जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, संचालक विनोद हासे, योगेश भालेराव, डॉ तुषार दिघे, दिलीप नागरे, विजय राहणे, नवनाथ आरगडे, रामनाथ कुटे, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, सेक्रेटरी किरण कानवडे, रामदास तांबडे, आदींसह कारखान्याचे विभाग प्रमुख कर्मचारी व विविध महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, १९४२ साली महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ ची घोषणा करताच संपूर्ण देश स्वातंत्र्य चळवळीत उभा राहिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित नेहरू यांसह असंख्य महान नेत्यांनी तुरुंगवास सहन केला, यात आपले संगमनेरही मागे नव्हते.
स्वातंत्र्य संग्रामात संगमनेरचेही महत्त्वपूर्ण योगदान असून, स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनीही वयाच्या 18 यावर्षी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला.या लढ्यात अखेरपर्यंत संघर्ष केला.

आज त्या सर्व वीरांना स्मरून, त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन “स्वातंत्र्याचा हा अमूल्य वारसा सदैव जपावयाचा आहे. देशाची राज्यघटना या अत्यंत महत्त्वाची असून लोकशाही व राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहणे गरजेचे असून जगामध्ये आज मोठी अशांतता निर्माण झाली आहे. भारतामध्येही अनेक राज्यांमध्ये अशांतता आहे. आपल्याला हा देश एकसंघ ठेवायचा आहे. वेगवेगळी संस्कृती भाषा जरी असली तरी राष्ट्रीय एकात्मता ही आपली मोठी ताकद आहे.
अनेक शक्ती जातीभेदाच्या नावावर राजकारण करू पाहत आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे. हा देश लोकशाही स्वातंत्र्य आणि राज्यघटना टिकली पाहिजे या विचाराने प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर इंजीनियरिंग कॉलेज येथे डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, युवक हीच खरी देशाची संपत्ती असून प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे. येणारा काळ हा भारताचा असून सर्वांना सोबत घेऊन जाणारी विकासाची वाटचाल आपल्या सर्वांना जोपासवायची आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या सुरक्षा विभाग व विविध महाविद्यालय व शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पाहुण्यांना मानवंदना दिली.
