तंदुरुस्त, कार्यक्षम नागरिक ही राष्ट्राची संपत्ती – गिरिश मालपाणी
७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मालपाणी उद्योग समुहात उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16
“निरोगी सुदृढ शरीर असलेले तंदुरुस्त कार्यक्षम नागरिक ही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून तंदुरुस्त राहून देशासाठी कार्य करण्याचा निर्धार करू आणि समर्थ भारत, सशक्त भारत, विकसित भारत घडवू या ”असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरिश मालपाणी यांनी केले.

मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने मालपाणी इस्टेटच्या प्रांगणात आयोजित ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्योगसमूहाच्या सुरक्षा विभागाच्या घोष पथकाने देशभक्तीपर धून वाजवून ध्वजास शानदार सलामी दिली. यावेळी समूहाचे बालाजी पाटील, शिवाजी आहेर, रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी, कामगार नेते कॉ. माधव नेहे आदी उपस्थित होते.

मालपाणी पुढे म्हणाले की, सर्वांनीच मनाने आणि शरीराने सदैव तरुण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य राखण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आहार, विहार आणि तंदुरुस्ती हे आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. बैठे काम करत असताना दर अर्ध्या तासाने उठून उभे राहिले पाहिजे. त्यामुळे पोटाचा घेर वाढत नाही असे सांगताना त्यांनी निरोगी जीवनासाठी साखर कमी खायला हवी किंवा पूर्ण टाळली पाहिजे. साखरेचे रुपांतर चरबीत होत असते, पुरेशी झोप खूप आरोग्यदायी असते, अनावश्यक जागरणही स्थूलतेचे कारण ठरते. रोज किमान सात तास व्यवस्थित झोप घेतली पाहिजे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
भारत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा जवानांनी सादर केलेल्या तालबद्ध आणि देखण्या संचलनाचे कौतुक करतांना मालपाणी यांनी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा हा सोहळा उद्योग समूहातील प्रत्येक घटकाचा उत्साह वाढवणारा आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुरक्षा जवानांना पारितोषिकही देण्यात आली. मुरारी देशपांडे यांनी भारतीय सैन्याच्या पराक्रमावर स्वतः लिहिलेला पोवाडा खड्या आवाजात सादर करीत उपस्थितांच्या मनातील राष्ट्रज्योत चेतवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी तर, आभार तिलाराम रावत यांनी मानले. या सोहळ्याला उद्योग समूहातील अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
