रॉंग साईड गाडी चालवून ट्राफिकला अडथळा आणणाऱ्या बस चालकासह सहा जणांवर कारवाई
राहुरी प्रतिनिधी दिनांक 25
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.

त्यावर उपाययोजना म्हणून चौकात वाहतूक नियमन करण्याबरोबरच रॉंग साईड वाहने टाकून ट्राफिक जाम करणाऱ्या सहा वाहनचालकांवर MVA 122/177प्रमाणे कारवाई केली. यापूर्वीही दोन वाहन चालकांवर धोकादायक वाहन चालवल्या बाबत कारवाई करून मान्य न्यायालयामार्फत दोन्ही वाहनांवर सुमारे पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.

बऱ्याच वेळी एसटी महामंडळाच्या बसेस चे चालक सुद्धा रॉंग साईड गाड्या टाकतात असे निदर्शनात आल्याने दिनांक 11 मे 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक प्रमुख राहुरी व राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख श्रीरामपूर यांना लेखी पत्र व्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईड गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत कळवलेले होते.

तरीसुद्धा आज सुमारे 11.30 चे सुमारास अकलुज डेपोची बस क्र:-MH-14-BT-4224 वरील चालकाने राहुरी कॉलेज ते राहुरी बस स्थानक दरम्यान ट्राफिक जाम झाल्याने रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाडी घातली ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सदर बस वर MVA 184 प्रमाणे कारवाई केली. सदर कारवाईबाबत मां न्यायालयाकडून चार हजार रुपयांपर्यंत दंड व सहा महिने ते एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये. तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई पीएसआय आहेर, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, सचिन ताजणे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (राहुरी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
