संगमनेर घरफोडीतील तीन आरोपी पकडले !
स्थानिक गुन्हे शाखा नगरची कारवाई
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22
संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील व्यापारी यांच्या कृषी सेवा कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली होती. या संदर्भात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्या नगरचे पथक आरोपींच्या शोधात असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या घरफोडीतील तीन आरोपींना पकडले आहे.

संदीप पोपट गिते (रा.पिंप्रीलौकी, ता.संगमनेर) हे त्यांचे कृषी सेवा केंद्र बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीतांनी त्यांचे दुकानाचा पत्रा उचकटुन त्यामधील माल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड या पथकाने हे कारवाई केली.
घरफोडीच्या गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तीन इसम हे त्यांचेकडील पीकअप गाडी क्र.एमएच-21-बीएच-5443 मधून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या रोडलगत आशिर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीचे औषधे संशयास्पद विकत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन 1) गणेश विठ्ठल आव्हाड, (वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर) 2) राज संदीप गायकवाड, (वय 24, रा.विळद, ता.अहिल्यानगर) 3) आदित्य संतोष इंगोले, (वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेतले.

पथकाने पीकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीचे औषधे व रसायन मिळून आले. पथकाने आरोपीच्या ताब्यातून 8 लाख 57 हजार 392 रू किं.त्यात महिंद्रा कंपनीचा पीकअप, शेतीचे कीटकनाशक, औषधे व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी दि.16/05/2025 रोजी पहाटे पिंप्रीलौकी फाटा, शिबलापूर, ता.संगमनेर येथून एका कृषी सेवा केंद्राचा पत्रा उचकटुन चोरी केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आश्वी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
