सेंद्रिय शेती मधून रोजगाराच्या मोठ्या संधी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा

संगमनेर प्रतिनिधी 10 —

धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला सकस व चांगल्या आहाराची गरज आहे. मात्र लवकर आणि जास्त उत्पादनासाठी अनेक रासायनिक औषधांची कृषी उत्पादनावर फवारणी केली जाते. निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती ही गरजेची आहे. शेती हा व्यवसाय म्हणून करताना सेंद्रिय शेती मधून रोजगाराची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये झालेल्या शाश्वत शेती व युवा उद्योजक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.प्रशांत नाईकवाडी, डॉ. प्रशांत सावंत, अरविंद औताडे, डॉ. बाळासाहेब राहणे, प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे, नारायणराव उगले, डॉ.बाळासाहेब वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ व प्रा. जी.बी बाचकर आदी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील 55% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. तर त्यांचा उत्पादनात वाटा अवघा 15% आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा शेतीवरील भार वाढतो आहे. म्हणून शेतीमध्ये आधुनिकता अन्य गरजेचे आहे.

कमी श्रम, कमी वेळ, कमी पैसा व अधिक उत्पन्न हे तत्व वापरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. विषमुक्त शेती ही अत्यंत गरजेची झाली असून निरोगी समाजासाठी निरोगी अन्न महत्त्वाचे आहे. जमिनीचा पोत व आवश्यक बाबी शेतीमध्ये टाकल्या पाहिजे. याच प्रमाणे शेतीसाठी कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जुन्या काळामध्ये खतासाठी खड्डे केले जायचे. मात्र सध्या खड्डे होत नसल्याने ते खत कंपोस्ट होत नाही. शेतीलाही हवा, ऊन, वारा,पाणी मिळाले पाहिजे.

शेती व्यवसायामध्ये महिलांचा वाटा मोठा असून तरुणांनी शेतीला व्यवसाय म्हणून पाहिले तर नक्कीच मोठे यश मिळू शकते. अनेक उच्चशिक्षित लोक आता शेतीकडे वळले आहे. आगामी काळात सेंद्रिय शेती ही अत्यंत महत्त्वाची असून या सेंद्रिय शेतीमधून उत्पादित सेंद्रिय मालाला मोठी मागणी आहे.

ऊस हे शाश्वत उत्पादन असून एकरी शंभर टक्के ऊस उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. राजेंद्र दुर्गुडे यांनी शेतीमधील पोत, शेतीचे प्रकार, माती परीक्षण, आवश्यक सेंद्रिय खतांचा पुरवठा, याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी सेंद्रिय शेती बाबत डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. प्रशांत नाईकवाडी ,प्रशांत सावंत, डॉ.बाळासाहेब राहणे, डॉ. मनोहर पाचोरे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. विठ्ठल शेवाळे संजय वाकचौरे डॉ.विलास भांगरे कांतीलाल लग्न अनिल देशमुख राधाकृष्ण गुळवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ केले. तर प्रा.जी.बी. बाचकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संगमनेर व अकोले तालुक्यातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

थोरात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतीवर विविध प्रयोग

महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माती परीक्षण, हवामान, सेंद्रिय खतांचा वापर पद्धती याबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती देताना नवीन उत्पादनांबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग करून यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन माजी आमदार डॉ. तांबे यांनी केले

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!