स्वतःची नावे टाकून हनुमान विजय रथाचा खासगी मालमत्ते सारखा वापर !
हिंदुत्ववादी युवकांनी केले अनेक आरोप
संगमनेर हनुमान जयंतीचा वाद चिघळला
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 29
संपूर्ण गावाचे ग्रामदैवत असणाऱ्या हनुमान जयंतीच्या हनुमान विजय रथावर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची नेमप्लेट ठोकल्यामुळे, कायमची नावे टाकल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी युवकांनी त्याचा निषेध केला असून हनुमान जयंतीसह विजय रथ सुद्धा खासगी मालमत्ता असल्यासारखा वापर सुरू आहे असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

हनुमान जयंती विजय रथासमोर सलामीसाठी गेलेल्या हिंदुराजा ढोल ताशा पथकाला ढोल ताशा वाजवण्यास आणि सलामी देण्यास मनाई केल्याच्या आरोपावरून जयंती उत्सव समितीचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पथकातील कार्यकर्त्यांमध्ये वाद बाचाबाची धक्काबुक्की शिवीगाळ झाली होती. त्याचबरोबर जयंती समितीकडून पोलिसांमध्ये फिर्याद देऊन हिंदुत्ववादी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदुत्ववादी युवकांमध्ये हा वाद आता मिटण्याचे नाव घेत नसून पूर्णपणे चिघळला आहे.

एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ग्रामदैवत असलेला हनुमान जयंती उत्सव हा गावाचा उत्सव असल्याने या उत्सवाचा वापर व्यक्तिगत खासगी मालमत्तेप्रमाणे केला जात असल्याचा प्रमुख आरोप आहे. यामध्ये ठराविक मंडळी पुढे आहे. काही जणांचा राजकीय स्वार्थ त्यात दडलेला आहे असाही आरोप आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हनुमान जयंती उत्सवाला अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये विघ्न टाकण्याचे काम काही विघ्न संतोषी मंडळी नेहमीच करत असतात. हिंदू राजा ढोल ताशा पथक हे सर्व स्थानिक मुलांचे पथक आहे. असे असताना देखील आणि अनेक वर्षांपासून हे पथक सलामी देत असताना देखील विनाकारण करायचा म्हणून विरोध करणे आणि हनुमान जयंती उत्सव समितीने हनुमान जयंती सोहळ्याचे खासगीकरण करण्याच्या हेतूने इतरांना विरोध करणे हे कितपत योग्य आहे ?

चंद्रशेखर चौकातील हनुमान मंदिर हे ग्रामदैवत आहे. संपूर्ण गावातून या उत्सवासाठी वर्गणी गोळा केली जाते. परंतु काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी हा सर्व प्रकारच खासगी मालकीचे असल्यासारखे दाखवतात. स्वतःचे नाव रथावर टाकण्यात आले आहे. फोटो सुद्धा लावण्यात आले होते. हे कितपत योग्य आहे असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे. हे नाव आणि फोटो रथावर लावून काहीजण खासगी मालकीचा रथ उत्सव असल्यासारखे रथासोबत मिरवत असतात. याला स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्यामुळे असे खासगीकरण योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

विरोध करणाऱ्यांना त्रास देण्यासाठी हिंदुत्ववादी युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर एका सोळा वर्षाच्या लहान मुलाचे देखील गंभीर गुन्ह्यात नाव टाकण्यात आले. त्याचे आयुष्य संपवण्याच्या हेतूने काही झारीतील शुक्राचार्य असे उद्योग करत आहेत. असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनावर राहुल शशिकांत नेहूलकर, विनायक पुंडलिक गरुडकर, ललित प्रवीण परदेशी, ललित शरद शिंपी, मयूर विनायक जाधव, शुभम मनोज परदेशी, महेंद्र नंदकिशोर भालारे आदींची नावे आणि सह्या आहेत.

अनेक वर्षांपासून हनुमान विजय रथाच्या मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा आहे. विविध ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी हनुमान जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे. अनेक वेळा रथाची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या लोकांनीही कधीच रथावर आपले नाव टाकले नाही. किंवा आपल्या नावाचा गवगवा केला नाही. मात्र एवढ्यातच आलेली काही मंडळी फक्त स्वार्थ साधण्यासाठी रथावर नावे टाकून हनुमान जयंती उत्सवाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे योग्य नाही.
राहुल नेहूलकर, संगमनेर
