बुधवारी संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मणबाबा यात्रा !
विविध कार्यक्रमांची रेलचेल; गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन
संगमनेर, प्रतिनिधी दि. 29
हजारों भाविकांचे श्रद्धास्थान आणि संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या श्री लक्ष्मणबाबा यांचा बुधवारी यात्रौत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने आजपासून पुढील तीन दिवस विविध धार्मिक आणि मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होणार आहे. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यंदा यात्रा कमिटीने नावाजलेल्या लोकनाट्य तमाशाही आयोजित केल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष कैलास भरीतकर यांनी दिली.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात असलेल्या श्री लक्ष्मणबाबांवर अनेकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धास्थानाबाबत अनेक अख्यायीका असून पूर्वी परस्परातील वाद, वेदना मिटवण्यासह परकिय आक्रमकांशी चारहात करणारा अवलीया म्हणूनही बाबांची ओळख आहे. अतिशय साधा पेहराव आणि हाती तीर-कमान धारण केलेल्या बाबांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणार्यांच्या इडापीडा टळतात असे भाविक सांगतात. पूर्वी पालिकेच्या प्रांगणात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण, प्रसूतीसाठी येणार्या महिला आरोग्यासाठी बाबांना शेरी वाटण्याचा (गूळ) नवस करीत. आजही ही परंपरा अव्याहतपणे पाळली जाते.

दरवर्षी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी लक्ष्मणबाबांची यात्रा भरते. त्या निमित्त शहरातील प्रत्येक नागरिक आपल्या मुला-बाळांसह बाबांच्या दर्शनाला येत असतात. यात्रा कमिटीच्यावतीनेही भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी यात्रेच्या पूर्वसंध्येला आज (मंगळवार) सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांच्या सुश्राव्य भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता.30) पहाटे श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक घातल्यानंतर प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात होईल. दुपारी चार वाजता पालिका प्रांगणातून बाबांच्या पादुकांची शोभायात्रा (छबीना), सायंकाळी साडेसात वाजता फटाक्यांची आतषबाजी व रात्री आठ वाजता छाया खिलारेसह दीपककुमार बारामतीकर यांच्या धमाल लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता.1) दुपारी चार वाजता पालिका प्रांगणात कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला असून जोड पाहून शंभर रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत बक्षीसे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या ग्रामोत्सवात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मणबाबा यात्रा व भंडारा समितीच्यावतीने अध्यक्ष कैलास भरीतकर, उपाध्यक्ष मुकेश काठे, शुभम ताम्हाणे, खजिनदार मनोज मंडलिक, बाळासाहेब गोडसे, सेक्रेटरी सागर आळकुटे, अंकुश मंडलिक, वीरु जेधे यांंनी केले आहे.
