संगमनेर हनुमान जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
हिंदुत्ववादी तरुणांचे भांडण चिघळले !
गावचा उत्सव हा खासगी मालमत्ता नसल्याचा आरोप
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 27
संगमनेरातील ऐतिहासिक हनुमान जयंती उत्सवाच्या दिवशी झालेल्या वादाचे रूपांतर हिंदुत्ववादी तरुणांच्या एकमेकातील भांडणाच्या स्वरूपात पुन्हा चिघळले आहे. हनुमान रथासमोर ढोल ताशा पथकाची सलामी देण्यासाठी गेलेल्या तरुणांमध्ये आणि हनुमान जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची धराधरी शिवीगाळ आणि भांडण झाले होते. त्याचा परिणाम आता एकमेकांच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यात झाला आहे.

संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव सोहळा मोठा आनंदाने साजरा होत असतो. पारंपारिक पद्धतीने या सोहळ्यासाठी गावातील सर्वच नागरिक आणि तरुण सहभागी होत असतात. महिलांना या हनुमान रथाला सुरुवातीला ओढण्याचा मान मिळालेला आहे. तसेच रथाला आणि हनुमान मंदिराला ध्वज हा संगमनेर पोलिसांकडून अर्पण केला जातो. हे कार्यक्रम सकाळी असतात. यावेळी रथाच्या पुढे वाजंत्री वाजवून सलामी दिली जाते. काही वर्षांपासून संगमनेर शहरातील युवकांच्या ढोल ताशा पथकाच्या वतीने अशा स्वरूपाची सलमी देण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी अशी सलामी देण्यास विरोध करण्यात आला हा विरोध हनुमान जयंती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप आहे. तर एकदा रथाची सुरुवात झाल्यानंतर पुन्हा रथ थांबवून सलामी देण्यात येत नाही असं समितीच्या काही लोकांचं म्हणणं आहे. आणि रथाला उशीर झाल्यावर दुपारी रथ ओढणाऱ्यांच्या पायाला उन्हामुळे चटके बसतात. त्यामुळे रथ सकाळी लवकर सुरू करावा लागतो असे काही मंडळींचे म्हणणे आहे. रथयात्रेच्या दिवशी सकाळी ढोल ताशा वाजवणाऱ्या पथकातील कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर हा वाद आणखी एकोपाला गेला होता.

त्यानंतर हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी हनुमान जयंतीच्या अनुषंगाने शहरातील दहा ते बारा हिंदुत्ववादी युवकां विरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचे मोठे पडसाद उमटले होते. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. काही ठिकाणी निषेधाचा सूर तर काही ठिकाणी समर्थनाचा प्रकार सुरू होता. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि शहरातील इतर सामाजिक व राजकीय पक्षाच्या संघटनांनी एकत्र येत शहर पोलिसांना या संदर्भात निवेदन देऊन उत्सवाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला होता.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करून आमचीही फिर्याद घ्या अन्यथा शहरात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पोलिसांना देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांची समजूत काढली होती. मात्र हिंदुत्ववादी युवक कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्याने आज पोलिसांनी हनुमान जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर दहा जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
कमलाकर भालेकर, योगराज परदेशी, चेतन तारे, अक्षय थोरात, हर्ष जोशी, शामसुंदर जोशी, गिरीश मेंद्रे, श्रीराम गणपुले, भगवान गीते, शुभम लहामगे.

हा गावचा उत्सव आहे, खासगी उत्सव नाही
हनुमान जयंती रथो उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेत विघ्न टाकण्याचे काम काही विघ्न संतोषी नेहमी करत असतात. हिंदू राजा ढोल ताशा पथक हे सर्व स्थानिक रंगार गल्ली चंद्रशेखर चौक नेहरू चौक वाडेकर गल्ली खंडोबा गल्ली येथीलच वादक आहे सर्व स्थानिक असताना देखील उगाच विरोध करणे व हनुमान जयंती उत्सव समिती ही खाजगीकरण करण्याच्या हेतूने इतरांना विरोध करणे हे कितपत योग्य आहे ? चंद्रशेखर चौकातील हनुमान मंदिर हे गाव दैवत आहे संपूर्ण गावातून या उत्सवासाठी वर्गणी काढली जाते परंतु काही लोक स्वतःच्या खाजगी मालकीच्या हक्काची असल्यासारखे स्वतःचे फोटो लावून रथ उत्सवात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करत आहेत याला सर्व स्थानिकांचा व संगमनेर करांचा विरोध आहे.. विरोधापर्यंत ठीक होतं परंतु हिंदुत्ववादी युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करणे व त्यांचा आयुष्य संपवणे हा हेतू काही झारीतील शुक्राचार्य करत होते आज त्यांना जशास तसे उत्तर मिळाले.
विनायक गरुडकर– अध्यक्ष हिंदू राजा ढोल ताशा पथक, संगमनेर
